नवी मुंबई : विविध तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे प्रमाण कमी होत असून, यामुळे नातेसंबंधांमधील अंतर वाढत आहे. संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत. हे गैरसमज दूर करून जीवनात आनंद निर्माण करणे ही प्रत्येक स्त्रीची जबाबदारी आहे. स्त्रियांमध्ये या जबाबदारीची जाणीव निर्माण झाली तर समाजात सकारात्मक वातारवरण निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वास सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला.सिडको कर्मचारी संघटनेतर्फे महिला दिनानिमित्त शुक्रवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन सिडको भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. लहानपणापासूनच मुलांमध्ये स्त्री-सन्मानाचे बीज पेरले पाहिजे. कारण बालपणी केलेल्या संस्कारांतूनच पुढची पिढी घडत असते. महिलांनी कुठल्याही विषयावर मोकळेपणाने संवाद साधावा; विशेषत: मुलांना योग्य वयात शालेय व कौटुंबिक पातळीवर लैंगिक शिक्षणाची अचूक माहिती देणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे सोनाली कुलकर्णी याप्रसंगी पुढे बोलताना म्हणाल्या. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नीलेश तांडेल, सरचिटणीस जे. टी. पाटील, मुख्य सामाजिक सेवा अधिकारी रिमा दीक्षित, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे उपस्थित होते.इतिहासात व आधुनिक काळात स्त्रियांनी कार्यकर्तृत्वाने आपला ठसा उमटवला आहे. सिडकोच्या विविध विकासकार्यांमध्ये महिला कर्मचारी व अधिकारीवर्गाचे अमूल्य योगदान आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. आज महिला विविध क्षेत्रांमध्ये चोखपणे जबाबदारी पार पाडत आहेत. अशा या कर्तबगार महिलाशक्तीचा आपण सर्वांनी सन्मान केला पाहिजे, असे मत सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल मनोगत व्यक्त करताना म्हणाले, संकटमय परिस्थिती धैर्याने सामोरे जाऊन,अडचणींवर मात करण्याचे एक अनोखे सामर्थ्य महिलांना अंगभूत आहे तसेच प्रत्येक स्त्रिया ध्यास विविध कौशल्य आत्मसात करुन कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण करणे हाच असतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिडको कर्मचारी संघटनेच्या सभासद स्नेहल कडू तर आभार प्रदर्शन सविता शिंदे यांनी केले. यावेळी सिडकोतील वरिष्ठ अधिकारी, अभियंते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
स्त्रियांवर सकारात्मक समाजनिर्मितीची जबाबदारी
By admin | Published: March 13, 2016 3:45 AM