- गणेश वासनिक, अमरावतीपेंच, ताडोबापाठोपाठ मेळघाटातील व्याघ्र संरक्षण दलाची भरती प्रक्रिया आटोपली असून ८१ तरुणांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’मध्ये स्थानिकांना प्राधान्य देत वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी भूमिपुत्रांवर सोपविण्यात आली आहे.वाघांच्या शिकारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता केंद्र शासनाने वाघांचे संरक्षण आणि संगोपनाची धुरा विशेष व्याघ्र संरक्षण दलावर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दलाची भरती प्रक्रिया दोन दिवसांपूर्वीच आटोपली. ८१ वनरक्षकांच्या भरतीसाठी हजारों उमेदवारांनी चाचणी दिली. मेळघाट व्याघ्र संरक्षण दलात धारणी, चिखलदरा तालुक्यातील स्थानिकांनाच समाविष्ट करण्याचा शासन निर्णय झाला होता.मेळघाट प्रकल्पात अकोट, सिपना व गुगामल हे तीन विभाग आहेत. व्याघ्र शिकारीच्या घटना बघता, स्थानिकांना हाताशी धरून तस्कर मोठ्या शिताफीने व्याघ्र प्रकल्पात शिरकाव करतात,असे आढळले आहे. त्यामुळे व्याघ्र संरक्षण दलात भूमिपुत्रांंचा समावेश केल्याने शिकाऱ्यांचे मनसुबे उधळले जातील. पेंच, ताडोबा व्याघ्र प्रकल्पात विशेष संरक्षण दल स्थापन झाल्यानंतर वाघांच्या शिकारीच्या घटनांना अंकुश लागला आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलाची भरती प्रक्रिया झाली आहे. मेळघाटातीलच उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याने त्याना रोजगार मिळणार आहे. हे दल भविष्यात वाघांच्या संरक्षणासाठी मैलाचा दगड ठरेल.- दिनेशकुमार त्यागी, क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प
वाघांच्या संरक्षणाची भूमिपुत्रांवर जबाबदारी
By admin | Published: July 12, 2015 3:45 AM