मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचाही मावळ लोकसभा मतदारसंघात धक्कादायकरीत्या पराभव झाला. दरम्यान, पार्थ पवार यांच्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. मावळमध्ये पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभावीच जबाबदारी सर्वस्वी माझीच आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पार्थ पवार यांच्या पराभावाबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘मावळमध्ये पार्थ पवार यांच्या झालेल्या पराभावाची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे.’ शिवसेना, भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपा-सेना युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात मुख्य लढत होती. या लढतीत श्रीरंग बारणे यांनी २, १५, ५७५ इतक्या मताधिक्यांनी विजय मिळवत विजयश्री खेचून आणली. 2014 मध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती श्रीरंग बारणे पुन्हा करतात, की पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला 'अच्छे दिन' दाखवतात, याबद्दल उत्सुकता होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मावळमध्ये श्रीरंग बारणे यांना ७, १८,९५० मतं मिळाली असून पार्थ पवार यांच्या पारड्यात ५,०३,३७५ मते मिळाली आहेत.
मावळमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी सर्वस्वी माझी - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:02 PM