कोल्हापूर : अंबाबाईला जणू मानवंदना देण्यासाठीच कोसळणारा पाऊस, मंत्रोच्चार, कलान्यास, महापूजा, बलिदान पूर्णाहुती, अवभृत स्नान, ‘अंबामाता की जय’चा गजर आणि भाविकांच्या अलोट गर्दीत गुरुवारी करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीची पुन:प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्ती संवर्धन प्रक्रियेत नागप्रतिमा घडवायची राहून गेल्याने मूर्तीच्या मस्तकावर चांदीचे नागप्रतीक प्रतिष्ठापित करून विधी करण्यात आले. तब्बल १३ दिवसांनंतर भाविकांना देवीचे मनोहारी दर्शन घडले. रासायनिक संवर्धन प्रक्रियेसाठी अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवले होते. बुधवारी मूर्ती संवर्धनाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर मूर्तीच्या मस्तकावरील साडेतीन वेटोळ्यांच्या नागाच्या प्रतिकाऐवजी मुकुट घडविल्याचे लक्षात आले. मात्र, प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात झाल्याने रात्रीत चांदीचा नाग घडविला. गुरुवारी सकाळी हे चांदीचे नागप्रतीक मूर्तीच्या मस्तकावर ठेवून विधी सुरू केले.सकाळी सात वाजता बंगलोर येथील उत्तराधिमठाचे स्वामी सत्यात्मतीर्थ व करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या उपस्थितीत विधीला सुरुवात झाली. मूळ मूर्तीच्या पायांवर फुलांनी पाणी शिंपडून उत्सवमूर्तीवर सहस्रकुंभाभिषेक केला. त्यानंतर श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते महापूजा झाली व त्यांनी आणलेले महावस्त्र अंबाबाईला नेसविले. आरतीनंतर उत्सवमूर्ती मुख्य यज्ञमंडपात आणली. येथे बलिदान पूर्णाहुती देऊन अवभृत स्नानानंतर पालखी मंदिरात आली. (प्रतिनिधी) वाद्यांच्या गजरात अवभृत स्नानदुपारी एक वाजता तोफेची सलामी, वाद्यांचा गजर, भालदार, चोपदार अशा लवाजम्यानिशी अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीत स्थापित करून पंचगंगा नदीकाठावर अवभृत स्नानासाठी नेण्यात आली. येथे नदीचे पूजन, सातूचे पीठ व दुधापासून बनविलेले जलचर यांची पूजा केली. त्यानंतर उत्सवमूर्तीचे नदीपात्रात अवभृत स्नान घडविले. त्यानंतर पुन्हा पालखी मंदिरात आली.
अंबाबाई मूर्तीची पुन:प्राणप्रतिष्ठापना
By admin | Published: August 06, 2015 11:09 PM