महाड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरू होते. पारदर्शक कारभार कसा असावा हे छत्रपतींनी सुराज्य करून दाखवून दिले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पुनर्निर्माणाचे शल्य आजवर तमाम शिवभक्तांना सतत बोचत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थाने रायगड किल्ल्याचे काम मार्गी लावले आहे. या रायगडाच्या पुनर्निर्माणाचे शिवधनुष्य हे केवळ शासनाने पेलायचे नसून, हे तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकार्यातून करायचे आहे. या शिवपुण्यतिथीनिमित्ताने किल्ले रायगडचे गतवैभव पुन्हा आणण्याचा संकल्प करू या, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समितीतर्फे रायगडावर ३३७ वी शिवपुण्यतिथी मंगळवारी साजरी करण्यात आली. त्यावेळी राजदरबार सभागृहात संपन्न झालेल्या अभिवादन सभेत चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला अभिनेते राहुल सोलापूरकर, आ. भरत गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, वीरबाजी पासलकर यांचे वंशज लक्ष्मणराव पासलकर, राजिप अध्यक्षा अदिती तटकरे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक , कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.दिल्लीच्या जोखडातून रायगड किल्ला मुक्त करून राज्य शासनाच्या ताब्यात आणण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याने या गडाच्या विकासाचे व सुशोभीकरणाचे दार आता खुले झाल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना यंदाचा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (वार्ताहर)- कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्थान व स्फूर्तिस्थान असलेल्या या रायगड किल्ल्याच्या विकासासाठी ५६५ कोटींचा विकास आराखडा केंद्र व राज्य शासनाने मंजूर केला असून, या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. जगदीश कदम यांनी स्मारक मंडळातर्फे गेली १२२ वर्षे रायगडावर शिवपुण्यतिथी सोहळा साजरा केला जात असल्याचे सांगितले.
किल्ले रायगडचे गतवैभव परत आणणार
By admin | Published: April 12, 2017 1:38 AM