मुंबई : रिक्षा-टॅक्सीचे भाडे दर निश्चित करण्यासाठी नव्याने नेमण्यात आलेल्या चार सदस्यीत समितीची बैठक आणि सुनावणी शुक्रवारी अंधेरी आरटीओमध्ये पार पडली. या बैठकीत अनेक संघटनांनी उपस्थिती दर्शवत प्रथम ओला, उबेर या खासगी टॅक्सी सेवांवर निर्बंध आणावेत आणि त्यानंतरच समितीने अन्य अंमलबजावणी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच दरवाढ न करण्याची शिफारस मुंबई ग्राहक पंचायतीकडून करण्यात आली. हकिम समिती २0१२ मध्ये राज्य सरकारकडून नेमण्यात आली आणि या समितीकडून रिक्षा-टॅक्सीचे भाडेदर निश्चित करण्यात आले. सलग काही वर्ष भाडेवाढ मिळाल्यानंतर गेल्या वर्षी ही समिती बरखास्त करण्यात आली आणि रिक्षा-टॅक्सींना भाडेवाढही करुन मिळाली नाही. त्याऐवजी चार सदस्यांची नवीन समिती परिवहनकडून स्थापन करण्यात आली. या समितीने मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सी संघटनांच्या मागण्या आणि त्याच्या मत ऐकण्यासाठी अंधेरी आरटीओत बैठक बोलावली होती. या बैठकीला अनेक संघटना उपस्थित होत्या. यासंदर्भात मुंबई आॅटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की,समितीकडून बैठकीसाठी निमंत्रण वेळेत देण्यात आले नाही. त्यामुळे रिक्षा चालकांची सविस्तरपणे बाजू मांडण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे आणखी पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी मागण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली.बैठकीत खासगी टॅक्सींचा पसारा नियमांना डावळून बिनदिक्कतपणे वाढत आहे. त्यावर कोणतेही निर्बंध नसल्याची बाब राव यांनी निदर्शनास आणू दिली. स्वाभिमान टॅक्सी युनियनचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. भाडेवाढ करण्याऐवजी प्रथम ओला, उबेरवर निर्बंध आणा. खासगी टॅक्सींवर निर्बंध आल्यावरच काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांना उत्पन्न चांगले मिळेल आणि त्यानंतरच भाडेवाढ करण्याचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. या मागणीवर आम्ही ठाम असल्याचे युनियनचे मुंबई अध्यक्ष के.के.तिवारी यांनी सांगितले. जय भगवान रिक्षा-टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बाळा सानप यांनीही ओला, उबेर टॅक्सी सेवांना कायद्याच्या चौकटीत आणण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)।मुंबई ग्राहक पंचायतीकडून भाडेवाढ करु नये, शेअर आॅटोच्या दर निश्चितीसाठी स्वतंत्र संस्था असावी, टॅक्सीवर इंडिकेटर बसवावे जेणेकरुन टॅक्सीत प्रवासी आहे की नाही हे समजण्यास मदत मिळेल इत्यादी मागण्या करण्यात आल्या.
ओला, उबेरवर निर्बंध आणा
By admin | Published: January 07, 2017 2:23 AM