पुणे : निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ससून सर्वोपचार रुग्णालयाकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रुग्णांसोबत येणाऱ्या नातलगांच्या संख्येवर, वेळेवर मर्यादा आणण्यात आली असून, कोणत्याही स्थितीमध्ये आणि शांतता सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर दिलेल्या निर्देशांच्या आधारे; तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारे या उपाययोजना करण्यात आल्या असून, तातडीच्या अपघात विभागात रुग्णासोबत फक्त २ नातलगांना प्रवेश दिला जाईल. रुग्णकक्षात (वॉर्ड) रुग्ण दाखल झाल्यास त्याच्यासमवेत फक्त एका नातलगास प्रवेश दिला जाणार आहे.लहान मुले, वृद्ध यांना रुग्ण भेटीस आणणे टाळावे, त्यांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे रुग्णांना पौष्टिक आहार दिला जातो, त्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.बी. जी. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, उपअधीक्षक डॉ. मनजित संत्रे यांनी याबाबत कळविले आहे.(प्रतिनिधी)>रुग्णभेटीसाठी येणाऱ्यांना पास घ्यावा लागणार असून, सकाळी ७ ते ८ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेतच रुग्णांना भेटता येईल. रुग्णसेवेसंबंधी काही तक्रार असल्यास योग्य मार्गाने संबंधित विभागातील वरिष्ठ डॉक्टर्स, वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, रुग्णालय परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल, असे वर्तन करू नये, अन्यथा डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट २०१० नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
रुग्णभेट संख्येवर निर्बंध
By admin | Published: April 03, 2017 1:07 AM