मुंबई, दि २३ : राज्यामध्ये सध्या कांद्याचे दर वाढले असून दरवाढीचा फायदा सर्वसामान्य कांदा उत्पादकांना होत आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा आयातीवर निर्बंध घालावेत; तसेच कांदा साठवणुकीवर निर्बंध घालू नयेत, अशी विनंती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे.
राज्यामध्ये सध्या कांद्याचे सरासरी दर १५०० ते १७०० रूपये प्रति. क्विंटलपर्यंत आहेत. कांद्याच्या दरामध्ये झालेल्या वाढीचा फायदा सर्वसामान्य कांदा उत्पादकांना होत आहे. सुमारे ७० ते ८० टक्के कांदा शेतक-यांनी कांदा चाळीमध्ये साठवणूक केलेला असल्याने दरवाढीचा फायदा कांदा उत्पादकांना होणार आहे. तरी केंद्र शासनाने कांदा आयातीवर निर्बंध घालावेत आणि कांदा साठवणुकीवर निर्बंध घालू नये. अशी विनंती खोत यांनी पासवान यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. तसेच याबाबत संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी विनंती रस्ते वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती देखील पणन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यापूर्वी अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी वाणिज्य मंत्रालयाला, कांदा निर्यातीवर प्रथम बंदी घालण्यात यावी आणि त्यानंतरच अन्य देशांतून देशांतर्गत वापरासाठी स्वस्त दरातील कांदा आयात करण्यात यावा असं सुचवलं होतं.
मागील महिन्यात कांद्यावरील निर्यात मूल्यात केंद्र सरकारने प्रति टन 300 डॉलर्सवरून 500 डॉलर्स अशी वाढ केली आहे. त्यामुळे कांदा निर्यातीचा वेग मंदावला आहे. मान्सून चांगला होणार नसल्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात असल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचे भाव चढेच राहिले आहेत.महाराष्ट्रातील लासलगाव येथे आशियातील सर्वात मोठय़ा कांदा बाजारपेठेत मागील महिन्यात कांद्याचे घाऊक भाव 50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी प्रतिकिलो 13.25 रुपये कांद्याचा भाव होता. तर यावर्षी तो 20.15 रुपये प्रतिकिलो इतका राहिला आहे. मात्र, किरकोळ विक्रीचा कांदा 30 ते 40 रुपये किलो दराने विकला जात आहे.