लातूर : खरीप पेरणीपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून, शेतकऱ्यांना बी-बियाणे तसेच खत कमी पडू दिले जाणार नाही़ तसेच पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे़ २१ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असून, ३१ मेपूर्वी विनातारण पीक कर्जाचे वितरण केले जाईल, अशी माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली़पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली़ त्या म्हणाल्या, बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार कर्जवितरण न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल़ पावसाचे प्रमाण व वेळेनुसार कोणते पीक घ्यावे, या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन दिले जाणार आहे़ मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही़ त्यामुळे मशागतीसाठी काही मदत करता येईल का? याचा विचार सुरू असल्याचे त्या म्हणाल्या़ पाण्याबरोबर चाराटंचाई देखील आहे़ दावणीला चारा देण्याची मागणी आम्ही विरोधी पक्षात असताना करीत होतो़ परंतु दावणीला चारा देण्याचा अनुभव तेवढा चांगला नाही़ त्यामुळे तुर्तास दावणीला चारा देणे शक्य नाही़ भविष्यात दावणीला चारा देण्याचा विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
‘पीक कर्जाचे पुनर्गठन करणार’
By admin | Published: April 18, 2016 1:13 AM