ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13 - दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थी नैराश्येतून आत्महत्येचं पाऊल उचलतात. पण नाशिकच्या सिडको भागात निकालाआधीच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. दहावीच्या निकालाचा धसका घेऊन कौस्तुभ मुंगेकर या विद्यार्थ्याने सोमवारी सकाळी आत्महत्या केली होती. पण आजचा निकाल खरंतर कौस्तुभला आणि त्याच्या परिवाराला सुखावणार होता. दहावीच्या परीक्षेत कौस्तुभला 69 टक्के गुण मिळाले आहेत. सिडकोच्या पाटीलनगर भागात कौस्तुभ राहत होता. कालिका पार्क, पाटीलनगर येथे कालिदास मुंगेकर हे गेल्या २० वर्षांपासून राहात आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा कौस्तुभ (१५) हा तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता व त्याने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. दहावीचा निकाल सोमवारपर्यंत लागला नव्हता. त्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाची तारीख देण्यात येत होती. मंगळवारी दहावीचा निकाल असे सोशल मीडियावर दिवसभर संदेश फिरत असल्याने आपण पास होऊ की नाही याचा कौस्तुभने धसका घेतल्याची चर्चा होती. दरम्यान, रविवारी (दि.११) कौस्तुभ व त्याचे आई-वडील रात्री उशिरापर्यंत घरात गप्पा मारत बसले होते. यानंतर सर्व झोपल्यानंतर कौस्तुभने मध्यरात्रीच्या सुमारास घरातील हॉलमध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील कालिदास हे सोमवारी पहाटे चार वाजता उठले असता त्यांना कौस्तुभने आत्महत्या केल्याचं आढळून आलं. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मयत कौस्तुभ हा एकुलता एक मुलगा होता. कौस्तुभच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.