मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे (पू.) येथील पोटनिवडणुकीचा निकाल उद्या (बुधवारी) स्पष्ट होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच काँग्रेसतर्फे वांद्र्याच्या निवडणुकीत उतरल्याने या पोटनिवडणुकीला वेगळाच रंग प्राप्त झाला होता.राजकारणात पुन्हा सक्रिय होण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी या निवडणुकीत सर्व यंत्रणा कामाला लावली. त्यामुळेच लोकसभा व विधानसभेवेळी एकमेकांच्या विरोधात असलेल्या कॉँग्रेसच्या नेत्यांनी एकजुटीने प्रचार केला. मुस्लीम मतदारांसाठी माजी खासदार प्रिया दत्त, नसीम खान, अस्लम शेख, बाबा सिद्दिकी तर उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्याची जबाबदारी मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, कृपाशंकर सिंह यांनी नेटाने सांभाळली. शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्यातर्फेही जोरदार प्रचार करण्यात आला. शिवसेनेच्या नेत्यांसह भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्र्यांनीही प्रचारामध्ये सहभाग घेतला होता.‘एमआयएम’च्या ओवेसी बंधूंसह कॉँग्रेस आघाडी व युतीच्या दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे रंगत वाढली होती. त्यामुळे किमान गेल्या वेळेइतकेतरी मतदान होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात मतदानादिवशी २५४ मतदान केंद्रे ही मतदारांविना ओस पडली होती. पोटनिवडणुकीत जेमतेम ३८.८६ टक्के मतदान झालेले आहे.
उद्या वांद्रे पोटनिवडणुकीचा निकाल
By admin | Published: April 14, 2015 2:14 AM