ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 23 - ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’असे उपहासाने म्हटले जाते, यामागे बहुधा न्यायदानास होणारा विलंब कारणीभूत असावा. मात्र; न्यायालयांनी आता पुर्वीच्या पद्धतीत अमुलाग्र बदल करून जलदगती न्यायदानास प्रारंभ केला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एम. बुक्के यांनी सोमवारी एकाच दिवसात इंदिरानगरमधील घरफोडीच्या गुन्ह्यातील एका खटल्यात सर्व साक्षीदार तपासून सराईत घरफोड्यास शिक्षा सुनावली आहे. नाशिक न्यायालयातील हा पहिलाच जलदगती न्याय असल्याचे सांगितले जाते आहे.
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, २० नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील पुजा एंटरप्रायजेस या दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील १३ हजार ४०० रुपयांची चोरी करण्यात आली होती़ ही चोरी करताना वडाळा गावातील सराईत घरफोड्या तथा तडीपार विशाल वसंत बंदरे ऊर्फ इंद्या यास रंगेहाथ पकडण्यात आले होते़ तर त्याचा फरार साथीदार शरद अशोक कांबळे (रा़भय्यावाडी, रंगरेज मळा, नाशिक) यास इंदिरानगर पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्याच्या घरातून अटक केली़ यामध्ये कांबळेला दोन दिवसांनी जामीन मिळाला तर इंद्या तेव्हापासून कारागृहात आहे़ पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये १२ जानेवारी रोजी आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
मुख्य न्यायदंडाधिकारी बुक्के यांनी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास या खटल्यातील साक्षीदारांचा जबाब घेण्यास प्रारंभ केला़ सरकारी वकील स्वाती दांडेकर यांनी या खटल्यातील सातही साक्षीदारांच्या साक्ष पूर्ण करून इंद्या व कांबळेविरूद्ध सबळ पुरावे सादर केले. तर बचाव पक्षाचे वकील एक़े क़ाळे यांनी इंदिरानगरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक तथा तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे यांची दीड तास उलटतपासणी घेतली. वऱ्हाडे यांनी इंद्या हा सराईत गुन्हेगार असून तडीपार असताना त्याने शहरात दाखल होऊन गुन्हा केल्याची साक्ष दिली.
या खटल्यात समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार मुख्य न्यायदंडाधिकारी बुक्के यांनी आरोपी विशाल बंदरे ऊर्फ इंद्या व अशोक कांबळे या दोघांनाही दोषी ठरवून सायकाळी सहा वाजता तीन महिने सक्तमजुरी व शंभर रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली़ एकाच दिवसात सर्व साक्षीदार तपासून शिक्षा सुनावल्याची नाशिकमधील ही पहिलीच शिक्षा असल्याची चर्चा न्यायालय वर्तुळात आहे.(प्रतिनिधी)