- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै - ऑगस्ट २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा एकूण निकाल २७.९७ टक्के इतका लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात २.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुरवणी परीक्षेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचले आहे,राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
म्हमाणे म्हणाले, राज्य मंडळातर्फे गेल्या वर्षापासून सप्टेबर- ऑक्टोबर ऐवजी जुलै-ऑगस्ट मध्ये पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. जुलै-ऑगस्ट २०१६ च्या पुरवणी परीक्षेसाठी १ लाख ४३ हजार ८९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या १ लाख ४२ हजार 968 विद्यार्थ्यांपैकी ३९ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे विद्यार्थी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता अकरावीच्या नियमित प्रवेशासाठी पात्र झाले आहेत.या परीक्षेत एक किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ७८ हजार १५३ एवढी आहे. हे विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षात एटीकेटी सवलतीद्वारे अकरावीस प्रवेश घेवू शकतात.
पुरवणी परीक्षा दिलेल्या व तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने २०१६-१७ पासून कौशल्य विकास कार्यक्रम निश्चित केला आहे. या कार्यक्रमासाठी २४ हजार 332 विद्यार्थी पात्र ठरले आहेत,असे नमूद करून म्हमाणे म्हणाले, पुरवणी परीक्षेत नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक ३५.७२ टक्के लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वात कमी २०.३२ टक्के आहे. नागपूर विभागातून प्रविष्ठ झालेल्या १६ हजार ६३३ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर कोकण विभागातील १ हजार २८९ विद्यार्थ्यांपैकी केवळ १९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
राज्याचा विभाग निहाय निकाल
पुणे ३०.९३
नागपूर ३५.७२
औरंगाबाद ३१.९९
मुंबई २०.३२
कोल्हापूर २१.३३
अमरावती २९.४५
नाशिक ३१.९०
लातूर २८.६६
कोकण १५.२९