पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ही चूक लक्षात आल्यानंतर, आता परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांना निकालात दुरुस्ती करून सुधारित गुणपत्रिका महाविद्यालयाकडे पाठविल्या आहेत; परंतु परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा निकाल नियोजित वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला; मात्र निकाल जाहीर करताना विद्यापीठाने काही नियमांचे पालन न केल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केल्या होत्या. त्यामुळे संबंधित निकाल जाहीर करताना सर्व नियमांचे पालन झाले आहे का? याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, अभियांत्रिकी विद्याशाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. गजानन खराटे व सध्याचे अभियांत्रिकी विद्याशाखेचे समन्वयक योगेश नेरकर यांची समिती स्थापन करण्यात आली होती.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने बेस्ट आॅफ परफॉर्मन्स, तसेच केवळ एकाच विषयात नापास असणाऱ्या विद्यार्थ्याला जर तो उत्तीर्ण होत असेल, तर एकूण गुणांच्या १ टक्का गुणवाढ द्यावी, असा निर्णय घेतला आहे. त्याला ओ फोर नावाने ओळखले जाते. परंतु, अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करताना विद्यार्थ्यांना या नियमाचा लाभ देण्यात आला नव्हता. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास झाले होते. विद्यापीठाने स्थापन केलेल्या समितीने ही बाब परीक्षा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या निकालात दुरुस्ती केली.बेस्ट आॅफ फरफॉर्मन्स अंतर्गत विद्यार्थ्यांना थेअरी परीक्षेत २१ गुण मिळाले असतील, तर त्यांना ७+3 असे १० गुण देण्याचा नियम आहे. परंतु, परीक्षा विभागाकडून तृतीय व अंतिम वर्षाचा निकाल जाहीर करताना, या नियमाचा विचार केला नव्हता. विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार परीक्षा विभागाने निकाल दुरुस्त करून सुधारित गुणपत्रिका मंगळवारीच सर्व महाविद्यालयांकडे पाठविल्या आहेत.- डॉ. गजानन खराटे, माजी अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अभियांत्रिकेचा चुकीच्या पद्धतीचा निकाल
By admin | Published: July 21, 2016 12:36 AM