ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत असूनही भाजपवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही. नुकत्याच लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर राजकीय वार करण्याची संधी साधली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीत भारतीय जनता पक्षाचा अतिदारुण पराभव व्हावा ही सगळ्यांसाठीच चिंतेची बाब आहे. जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांत हा धक्का बसला आहे. वाराणसी म्हणजे काशी. काशीतील राजकीय निकालाने उत्तर प्रदेशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते दिसते, पण महाराष्ट्रातील ज्या १९ नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्याचे सर्व निकालही भाजपची ‘काशी’ करणारेच आहेत. बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश व आता महाराष्ट्रात अशी ‘काशी’ व ‘गोची’ का होत आहे, यावर वेळीच चिंता व मंथन केले नाही तर काशीची गंगा जास्त गढूळ झाल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे.
महाराष्ट्राचेच पहा राज्यातील १९ नगरपालिकांत काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ११ नगरपालिकांवर विजय मिळवला. शिवसेना दुसर्या क्रमांकावर आहे, पण सत्तारूढ भाजपला एकही नगरपालिका जिंकता आली नाही. मुख्य म्हणजे विदर्भातही त्यांची पीछेहाट झाली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या जामखेडमध्येही भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. शिवसेनेला १९ नगरपालिकांत ५९ जागा मिळाल्या, तर भाजपला ३३ जागा मिळाल्या. मुंबईतील चेंबूरची पालिका पोटनिवडणूक शिवसेनेने प्रचंड मताधिक्याने जिंकली. पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी तीन पायांची घोडदौड सुरू आहे व भाजपचा चौथा पाय चालेनासा झाला असे या अग्रलेखात लिहीले आहे. दीडवर्षापूर्वी भाजपची जी ताकत होती ती आता घटली असून भाजप कमकुवत होत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
काय म्हटले आहे अग्रलेखात
लोकसभा निवडणुकीत विजयी झेंडा फडकला तो त्यावेळच्या मोदी हवेवर. पण हवेतले फुगे फार काळ तरंगत नाहीत व ते मलूल होऊन खाली पडतात असा आपल्या देशाचा इतिहास सांगतो. दिल्ली, बिहारच्या विधानसभा निवडणुकांनी तेच दाखवून दिले. गुजरात-मध्य प्रदेशातही काँग्रेस पक्षाने मुसंडी मारली ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल. महाराष्ट्रासारखे राज्य आज भाजपच्या हातात आहे, पण जनतेचे हात रिकामेच आहेत. त्या रिकाम्या हातांनीच कमळाबाईच्या विरोधात मतदान केले. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखे पक्ष जनतेच्या मनातून साफ उतरले होते. म्हणून भाजपला जास्त जागा देऊन सत्तेवर आणले. मग भाजपचा कारभार काँग्रेसपेक्षा वाईट ठरवून जनता मतपेटीद्वारे निषेध करीत आहे काय? हा विचार करावा लागेल. महाराष्ट्रात दुष्काळ आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जनजीवन उद्ध्वस्त झाले आहे.
सरकार घोषणांचा पाऊस पाडते आहे, पण शेतकर्यांचे घसे कोरडे आहेत. त्यांच्या दु:खावर उतारा म्हणजे घोषणा नव्हेत. शेती, उद्योगातील महाराष्ट्राचे स्थान पहिल्या क्रमांकाचे होते. ते आज खरोखर राहिले आहे काय, याचाही ‘चिंतन’ विचार व्हायला हवा. नगरपालिका निवडणुकांतील काँग्रेसची मुसंडी हा ‘ट्रेलर’ आहे व मुख्य सिनेमा सुरू व्हायचा आहे. या लहानसहान निवडणुकांतूनच लोकांचे मन ओळखायला हवे. ज्या लोकांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोदींची हवा निर्माण केली त्या हवेतच लोकांना गुदमरल्यासारखे होत असेल तर ‘काय चुकतेय?’ हे एकत्रित बसून तपासायला हवे. सत्तेचा वापर पक्षबांधणी वगैरेसाठी केला जातो असे म्हणतात, पण अशा बांधण्या म्हणजे गाड्यास जुंपलेल्या बैलासारख्या ठरतात. जोखड झुगारून बैल कधी उधळेल व गाड्यावरच्या मालकांना कधी उलथवून टाकेल त्याचा नेम नसतो.
आज तरी नगरपालिका निवडणुकीत भाजपचा बैलगाडा मागे म्हणजे सगळ्यात शेवटी आला आहे. महाराष्ट्राचे राजकीय पर्यावरण धोक्यात असल्याचे हे संकेत आहेत