मुंबई : विधानसभा निवडणुकीचा फटका परीक्षांना बसला आहे. प्रथम सत्राची परीक्षा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचा काही शाळांनी ठरविले असून तोंडी परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचा पर्याय बहुतांश शाळांनी निवडला आहे. शाळांच्या परीक्षेच्या कालावधीत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळामार्फत बाल हक्क आयोगाकडे करण्यात येणार आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी शाळांच्या परीक्षा ६ ते १८ आॅक्टोबर या कालावधी पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने एक दिवस आधी शाळा निवडणूक अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्याव्या लागतात. त्यामुळे या कालावधीत शाळांमध्ये परीक्षा घेता येणार नाहीत. तसेच मतदानापूर्वी शिक्षकांना तीन दिवस निवडणूक कामाचे प्रशिक्षण देण्यात येते. याचे वेळापत्रक अद्याप निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले नसल्याने शाळांच्या परीक्षा कधी घ्यायच्या, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. निवडणुकीमुळे काही शाळा २५ सप्टेंबर ते ५ आॅक्टोबर या कालावधीत परीक्षा घेण्याचा विचार करीत आहेत. प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने शिक्षकांना तो लवकरात लवकर पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची उजळणी करण्यास वेळ मिळणार नाही. दहावी-बारावीच्या आॅक्टोबरमधील परीक्षेचे पेपर तपासण्याचे कामही शिक्षकांकडे येणार असल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांपुढे पेच निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीमुळे शालेय परीक्षांवर परिणाम
By admin | Published: September 15, 2014 2:28 AM