- सोपान पांढरीपांडे, नागपूर
राज्यातील सहकार क्षेत्राची शिखर बँक असलेली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) आपला १०६ वर्षे जुना संस्थागत कर्जपुरवठ्याचा पायंडा बदलून रिटेल बँकिंगमध्ये उतरणार आहे.एमएससी बँकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली. प्रशासक मंडळाचे अन्य सदस्य के.एन. तांबे, अशोक मगदूम व प्रबंध संचालक प्रमोद कर्नाड शुक्रवारी प्रशासक मंडळाच्या बैठकीसाठी नागपुरात आले होते.रिटेल बँकिंगसाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर एमएससी बँकेकडे तयार आहे व मार्चपर्यंत आम्ही सात नव्या शाखा उघडणार आहोत. यापैकी कोल्हापूर शाखा सुरू झाली असून पुणे, नांदेड, सोलापूर, नाशिक, धुळे व बीड येथे शाखा येणार आहेत. एमएससी बँकेच्या सर्व ४८ शाखांमध्ये ‘एनीव्हेअर बँकिंग’ सुविधा ग्राहकांना मिळेल असे डॉ. सुखदेवे म्हणाले.एमएससी बँक गृहकर्ज, वाहन कर्ज, सुवर्ण कर्ज, पर्सनल लोन याशिवाय किरकोळ व ठोक व्यापाऱ्यांसाठी कॅश क्रेडिट लिमिट, तारण कर्जसुद्धा सुरू करणार आहे. सध्या गृहकर्जाची मर्यादा ३० लाख रुपये तर पर्सनल लोनची मर्यादा एक लाख असेल. ही सर्व कर्जे ग्राहकांना ९ ते १३ टक्के व्याजदराने मिळतील, असेही डॉ. सुखदेवे म्हणाले.उद्योग क्षेत्रातील मोठ्या प्रकल्पांसाठी एमएससी बँक जिल्हा सहकारी बँका व नागरी सरकारी बँकांच्या भागीदारीत संयुक्तरीत्या कर्जपुरवठा (कॉन्सॉर्शियम फंडिंग) करेल. कृषी क्षेत्राला एमएससी बँक नाबार्डच्या पुनर्वित्त कर्ज पुरवठ्याअंतर्गत पीक कर्ज व जमीनविकास कर्ज देत आहे, आता त्यात ठिबक सिंचन योजनेसाठी व कृषी कर्जासाठी वित्तपुरवठा एमएएससी बँक करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.सध्या एमएससी बँकेजवळ १५,१४५ कोटी ठेवी असून बँकेने १४,४९१ कोटी कर्जपुरवठा केला आहे. यामध्ये ८२०० कोटी कर्ज जिल्हा सहकारी बँका, ४००० कोटी कर्ज साखर कारखाने, २२० कोटी कर्ज सूतगिरण्यांना दिले आहे. यापैकी साखर कारखाने व सूतगिरण्यांकडे मोठ्या प्रमाणात कर्ज थकीत आहे. त्यामुळे रिटेल बँकिंगमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे, असाही खुलासा डॉ. सुखदेवे यांनी केला.- प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी बँकेने स्वेच्छानिवृत्ती योजनेद्वारे २०० कर्मचारी कमी केले आहेत. सध्या बँकेत १२०० कर्मचारी आहेत व बँकेने तरुण फायनान्स प्रोफेशनल्सची भरती सुरू केली आहे. खासगी बँकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता कर्मचाऱ्यांमध्ये उत्पन्न करणे हे खूप मोठे आव्हान आहे, हेही डॉ. सुखदेवे यांनी मान्य केले.