मुंबई : लेखा विभागाच्या दिरंगाईमुळे एसटीच्या मुंबई विभाग व मुख्यालयातील निवृत्त कर्मचारी तीन वर्षे पेन्शनपासून वंचित असून, ही पेन्शन संबंधित लेखा विभागाने गिळंकृत केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाने पेन्शनचे कामकाज पूर्णतः संगणकीकृत करण्याबाबत महामंडळास २०१२ मध्ये कळविले होते. परंतु, मध्यवर्ती कार्यालयातील प्रशासनाने व लेखा विभागाने अंमलबजावणी केली नाही. परिणामस्वरूप पेन्शन दावे प्रलंबित आहेत. महामंडळाच्या प्रमुखांनी हा विषय भविष्य निधी आयुक्तांकडे मांडल्यास तोडगा निघू शकेल. मात्र तशी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.वांद्रे येथील प्रादेशिक कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयाकडे मुंबई विभाग व मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचे मिळून २०१७ पासूनचे सुमारे दोन हजार २५० कर्मचाऱ्यांचे पेन्शन दावे वेगवेगळ्या कारणांसाठी प्रलंबित आहेत. यापैकी ४६५ कर्मचाऱ्यांचे पेन्शन लागू होण्यापूर्वी निधन झाले. मृत कर्मचाऱ्यांचे वारसदार आणि तसेच सेवानिवृत्त कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत.
दिरंगाईमुळे निवृत्त एसटी कर्मचारी पेन्शनपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 7:28 AM