लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्या निवृत्त अधिकाºयांना मनमानी पद्धतीने मुदतवाढ देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महानिर्मिती कंपनीत निवृत्त संचालक पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक भीमाशंकर मंथा, श्रीकांत चौधरी यांच्यासह ए. एस. परते आणि चौधरी हे अधिकारी आजही कार्यरत आहेत. महापारेषण कंपनीत डॉ. संजय कुलकर्णी आणि ओमप्रकाश एम्पाल हे अनुक्रमे एक वर्ष आणि सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले होते. कंपनीने त्यांना आजही सेवेत ठेवलेले आहे. महावितरण कंपनीचे शंकर शिंदे (दीड वर्ष), श्रीकांत जलतारे (११ महिने), पी. एस. पाटील (सहा महिने) आणि पारटकर हे अधिकारी निवृत्तीनंतरही सक्रिय आहेत. कृषी पंपधारकांना एचव्हीडीएस योजनेअंतर्गत मोफत वीज जोडण्या देण्याची मोहीम सरकारने सुरू केली होती. त्यात महावितरणच्या या अधिकाºयांना सामावून घेतल्याची माहिती कंपनीतल्या अधिकाºयांनी दिली.
कामात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत महावितरणचे मुख्य व्यवस्थापक संदेश हाके यांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्याच कालावधीत हाके निवृत्त झाले. त्यानंतर त्यांची लगेचच ऊर्जा खात्याच्या अखत्यारीत असलेल्या सूत्रधार कंपनीवर नियुक्ती केले. पदावर किंवा कामे प्रलंबित आहेत म्हणून मुदतवाढ देणे अयोग्य आहे. याच्या तक्रारी केंद्र व राज्य सरकारकडे केल्याचे महावितरणचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक राकेश जाधव यांनी सांगितले.