मुंबई : महापुराच्या तडाख्यातून वाचलेला खरीप हंगाम परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झाल्याचे विदारक चित्र महाराष्ट्रात आहे. हातातोंडाशी आलेली ज्वारी, बाजरी, मका, कडधान्ये यांच्यासह सोयाबीन, कापूस या नगदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विधानसभा निवडणुकांची धामधूम संपल्यानंतर नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याला वेग येईल, या शेतकऱ्यांच्या आशेवर पूर्णपणे पाणी फेरल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.मराठवाडा : नशिबी आधी कोरडा अन् आता ओला दुष्काळएरव्ही नेहमीच पावसासाठी तहानलेल्या मराठवाड्यावर यंदाही वरुणराज रुसला होता. पण जाता जाता नको तितकी ‘मेहरबानी’त्याने केल्याने नद्या- नाल्या, धरणे खळाळली असली तरी पिकांचे मात्र वाटोळे केले आहे. आधीच्या थोड्या- फार पावसावर आलेली पिके परतीच्या पावसाने उद्ध्वस्त केली.हानीचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झाला नसला तरी मराठवाड्यात अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात २.२३ लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीन, कापूस, केळीसह उसालाही या पावसाचा तडाखा बसला. तूर व अन्य पिकांचेही नुकसान झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक संकटात सापडले आहे़ एकट्या सोयाबीन पिकाच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास अडीच हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते़ याशिवाय, कांदा, द्राक्ष, कापूस या पिकांनाही मोठा फटका बसला आहे़ शेतात पाणी साचून राहिल्याने कांदा जागीच सडला आहे़ तर पोटºयात आलेली ज्वारी काळी पडली आहे़
औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे वाटोळे झाले. आतापर्यंत वैयक्तिक चार हजार पंचनामे पूर्ण केल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जालना जिल्ह्यातील जवळपास १ लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबिन ८० टक्के, कापूस ४० तर ज्वारी पिकाचे ६० टक्के नुकसान झाले आहे. एकूण खरिपातील ४ लाख ११ हजार ३७५ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.लातूर जिल्ह्यात जवळपास १ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, ज्वारी यासह कपाशीचे नुकसान झाले आहे.
नाशिक : ७० टक्के द्राक्षबागा धोक्यात, कांद्यालाही पावसाचा मोठा फटकापरतीच्या पावसाने द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात ७० टक्के द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. अधिकृत नोंदणी असलेल्या सुमारे पावणेदोन लाख एकरातील बागांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसल्याने हा आकडा दोन लाख एकर असण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.राज्यात सर्वात जास्त द्राक्ष पीक नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. राज्यातील एकूण द्राक्ष उत्पादनातील ८० टक्के द्राक्षे एकट्या नाशिकची असतात. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये जवळपास ७० टक्के बागांची गोडबार छाटणी पूर्ण झाली आहे. छाटणी झालेल्या बहुतांश बागा चाळीस ते पन्नास दिवसांच्या दरम्यान असल्याने सर्व बागा फ्लॉवरिंग आणि दोड्यात असल्याने त्या काळात एकही पाण्याचा थेंब नको असतो. परंतु पावसाने द्राक्षबागा अक्षरश: पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे सर्व बागा कुजून आणि मनी गळून पडले आहेत.
लाल कांद्याचे नुकसानपरतीच्या पावसामुळे लागवड केलेला लेट खरीप लाल पोळ कांदा अन् पुढील रब्बी हंगामासाठी टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे संकटात सापडली असून, यंदा कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. लेट खरीप लाल पोळ कांदा शेतजमिनीतच सडत आहे.खान्देश : पंचनाम्यांना सुरुवात; ज्वारी, मका, कापसाचे सर्वाधिक नुकसानखान्देशात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात ज्वारी, कापूस, मका, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी जळगाव जिल्ह्यात झालेल्या गारपीटमुळे लिंबू व संत्र्याच्या बागांचे नुकसान झाले.सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांकडून देण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठी व मंडळ अधिकाºयांमार्फत गुरुवारपासून पंचनाम्यांना सुरुवात केली आहे.जळगाव जिल्ह्यात ज्वारी, मका, बाजरी, कपाशी यासह संत्री, मोसंबी व लिंबूच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक विहिरीदेखील धसल्यात. धुळे जिल्हात ज्वारी, बाजरी, मका या पिकांच्या कणसांवर कोंब फुटले आहेत. यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात नवापुर व शहादा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. नवापूर तालुक्यातील धायटा भाग, पश्चिम पट्टा, रायपूर या भागातील उभ्या पिकांचे नुकसान झाले़ शहादा तालुक्यातील पुसनद, अनरद, वडाळी, जयनगर, कोंढावळ, सोनवद येथे पाऊस आणि वाºयामुळे पपईची झाडे कोलमडून पडली होती़
विदर्भ : १० लाखांहून अधिक शेतकरी बाधितविदर्भात अमरावती विभागाला सर्वाधिक तडाखा बसला असून ५,३८२ गावांमधील १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरमधील खरिपाची पिके उद्ध्वस्त झालेली आहेत. यामध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकरी बाधित झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. या अनुषंगाने विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी जारी केले.यंदा कापूस वेचणीचा व सोयाबीन सोंगणी अन् मळणीचा हंगाम सुरु असतांना १८ आॅक्टोबरपासून सातत्याने पाऊस होत आहे. त्यामुळे सोयाबीन हे जागेवरच थिजले. विभागीय कृषी सहनिबंधकांच्या प्राथमिक नजर अंदाज अहवालान्वये अमरावती जिल्ह्यात १,४५,०५३ क्षेत्रातील खरिपाची पिके बाधित झालीत. अकोला ३,२३,५३५, बुलडाणा ५,१९,१९६, यवतमाळ १,०४,५५९ व वाशिम जिल्ह्यात १,२५,९३५ हेक्टरवरील खरीप मातीमोल झालेला आहे.पूर्व विदर्भात सोयाबीन, धान, कपाशी, भाजीपाला सडला.सांगली : ६० हजार एकरवरील द्राक्ष बागांचे नुकसानसुमारे ६० हजार एकरावरील द्राक्षांसह अन्य पिकांच्या नुकसानीचा आकडा १ हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. द्राक्ष उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार असल्याने, बेदाणा उत्पादनही ३० टक्क्यांनी घटणार आहे.सात दिवसांपासून अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने ठाण मांडले आहे. जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख एकर द्राक्षक्षेत्र आहे. त्यापैकी सप्टेंबरमध्ये ५० टक्के द्राक्षबागांची पीक छाटणी घेण्यात आली होती. लवकर छाटणी घेतल्यानंतर, द्राक्षाला चांगला दर अपेक्षित असतो; मात्र परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने द्राक्षबागायतदारांचे सर्वच गणित चुकवले. दावण्यासह अनेक रोगांनी बागा वेढल्या आहेत. फुलोरा अवस्थेत असणाऱ्या द्राक्षबागांत घडकूज झाली आहे, तर मणी तयार झालेल्या बागांची मणीगळ झाली आहे.पुणे विभाग : १ लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसानपुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील तब्बल १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे पुरामुळे नुकसान झाले आहे. त्यात भात, भाजीपाला आणि ऊस पिकाचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल २२ ते २५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भाजीपाला, भात, बाजरी आणि रब्बी ज्वारीच्या पिकांचे अधिक नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जुलै आणि सप्टेंबरमधे जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी जनावरे देखील वाहून गेली होती. पुणे शहर आणि हवेली, भोर, पुरंदर, बारामती तालुक्यातील ७६ गावांना पूराचा अधिक फटका बसला होता.कोकण : स्वतंत्रपणे ५० कोटी अनुदान द्यासिंधुदुर्ग : दिवाळीमध्ये आलेल्या क्यार वादळामुळे कोकण किनारपट्टीवरील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपद्ग्रस्तांसाठी स्वतंत्रपणे ५० कोटी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. कोकणात भात, सुपारी, नारळ व केळी या पिकांचे नुकसान झाले असून याचसाठी केळी २८० रुपये, नारळ ६००० रुपये, सुपारी ४००० रुपये ( प्रती झाड ) या दराने नुकसान भरपाई मिळावी. मच्छीमारांची जाळी, खारवलेले मासे, मीठ, नौकांचे व इंजिनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.