पुणे : दरवर्षी १ आॅक्टोबरपर्यंतच देशाच्या अर्ध्या भागातून परत जाणारा मान्सून यंदा आॅक्टोबर महिन्यातही सक्रीय राहण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील अनापगड, बिकानेर, जैसरमेल भागातून मान्सून परतला असला तरी अद्यापसौराष्ट, गुजरातमध्ये सक्रीय आहे. त्यामुळे यंदा आॅक्टोंबरमध्येही मध्य भारतासह दक्षिण भारतात परतीचा पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे़ कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून पुढील चार दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ गुजरात, सौराष्ट, कच्छ परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस जोरदार पडत आहे़ याशिवाय हिमालयीन रांगा, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि कोकण व गोवा या परिसरात मान्सून सक्रीय आहे़ उत्तरप्रदेश, उत्तराखंड, हरियाना, जम्मू काश्मीर, पश्चिम राजस्थान, मराठवाडा, विदर्भात, कर्नाटक अंतर्गत भाग आणि केरळ परिसरात पाऊस कमी झाला आहे़ गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोयना येथे १००, ताम्हिणी ९०, दावडी ७०, शिरगाव, डुंगरवाडी येथे ६० मिमी पाऊस पडला़ कोकणातील मंडणगड ७०, चिपळूण, लांजा, म्हसाळा, पोलादपूर, रत्नागिरी, ठाणे ४०, भिवंडी, हर्णे, खालापूर, खेड, महाड, माणगाव, माथेरान, मुरबाड, राजापूर, रोहा, श्रीवर्धन, सुधागड, पाली, वैभववाडी ३० मिमी पावसाची नोंद झाली आहे़ मध्य-महाराष्ट्रात महाबळेश्वर, पेठ ७०, दिंडोरी, हरसूल, इगतपूरी ३०, चंदगड, गगनबावडा, ओझरखेडा २० मिमी पाऊस पडला़ (प्रतिनिधी)
आॅक्टोबरमध्येही परतीचा पाऊस
By admin | Published: September 21, 2016 5:15 AM