मुंबई : तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात होत असलेल्या परतीच्या पावसाचा तडाखा बसत आहे. मंगळवारी सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कणकवली शहराला पावसाने झोडपले. तब्बल तासभर परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परभणी आणि जळगाव जिल्ह्यातही पावसामुळे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.
वीज पडून दोन मृत्यू, ६ जखमी परभणी/जळगाव : जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे मंगळवारी दुपारी वीज पडून एका जणाचा जागीच मृत्यू झाला. तसेच, सहा जण जखमी झाले आहेत. यातील दोन जण अतिगंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला पाठवण्यात आले आहे. दुसऱ्या घटनेत जळगाव जिल्ह्यातील खर्डी शेतशिवारात अंगावर वीज पडून ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दुपारी घडली.