पुणे : लवासाने हडप केलेली १३ आदिवासींची २०० एकर जमीन त्यांना परत करण्याचे आदेश तत्कालीन मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुभाष बोरकर यांनी दिले आहेत. ही जमीन सरकारजमा झाली असून, आठ-दहा दिवसांत ती परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे मावळ-मुळशी प्रांत अधिकारी सुनील थोरवे यांनी सांगितले. पहिल्यापासूनच वादात सापडलेल्या लवासाला यामुळे मोठा धक्का बसल्याचे मानण्यात येत आहे.लवासाकडून मोसे खोऱ्यातील वसरगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील २० गावांमधील तब्बल २५ हजार एकर जमिनीवर ‘लेक सिटी’ उभारण्यात येत आहे. लवासाने खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना बंदी असताना आदिवासींच्या जमिनी घेतल्या. त्या विरोधात स्थानिकांनी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मोसे खोरे बचाओ’ जनआंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविला होता. लवासामधील जमीन खरेदी विक्री व्यवहाराच्या गैरप्रकाराबाबत विरोधी पक्षनेतेपदी असताना, एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून, सर्व व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने लवासाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. अद्याप शासनाकडून आदेश मिळालेला नसून तो मिळाल्यानंतर अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ, असे लवासा कंपनीने सांगितले.‘स्थानिक आदिवासींच्या मदतीने लवासाच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. या आधी दोन आदिवासी कुटुंबांना जमीन परतही मिळाली. मात्र, इतरांना त्यांच्याकडे जातीचा दाखला नाही, असे सांगून ती नाकारण्यात आली होती,’ असे मेधा पाटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आदिवासींच्या जमिनी परत करा
By admin | Published: October 07, 2015 1:55 AM