मुंबई : वादग्रस्त पोलीस अधिकारी दया नायक यांचे निलंबन रद्द करण्यात आले असून पुन्हा एकदा मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत नियुक्ती करण्यात आली आहे. खातेनिहाय चौकशीनंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले असल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. बेनामी मालमत्ता व बनावट चकमकीमुळे गेल्या दहा वर्षापासून सहाय्यक निरीक्षक दया नायक हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अवैध मालमत्ता जमा केल्याप्रकरणातील चौकशीतून निर्दोष सुटल्यानंतर पाच वर्षापूर्वी त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. मुंबईच्या हत्यार विभाग (एल) नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर जुन २०१२ मध्ये त्यांची नागपूरला बदली करण्यात आली. मात्र दया नायक हे त्याठिकाणी हजर झाले नाहीत. सातत्याने तीन वर्षे गैरहजर राहिल्याने गेल्यावर्षी जुलैमध्ये निलंबित करण्यात आले होते. मात्र त्याविरुद्ध त्यांनी ‘मॅट’ मध्ये आपील केले होते. त्याबाबत प्राधीकरणाने त्यांचे निलंबन रद्द ठरवून पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी सेवेत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महासंचालक कार्यालयाने त्यांना पुन्हा सेवेत हजर करुन घेतले आहे. पूर्वी नियुक्ती असलेल्या मुंबईच्या हत्यार विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)दया नायक हे १९९५ च्या बॅचचे उपनिरीक्षक १२, १३ वर्षापूर्वी ‘बिग बी ’अमिताभ बच्चन यांचे बॉडीगार्ड होते. त्यानंतर क्राईम ब्रॅचमध्ये बदली झाल्यानंतर गुन्हेगारी टोळ्याविरुद्ध बनविण्यात आलेल्या ‘एन्काऊंटर’ पथकात नियुक्ती झाल्यानंतर ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. ‘एन्काऊंटर स्पेशालिस्ट ’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या दया यांच्या नावे ८० ‘एन्काऊंटर’ आहेत. विरोधी टोळीकडून सुपारी घेवून गुंडांना खोट्या चकमकीत मारले, त्यातून कोट्यावधीची माया मिळविल्याचा आरोपातून निलंबन करण्यात आले होते. मात्र ‘मॅट’ व त्यानंतर उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले होते.
वादग्रस्त दया नायक पुन्हा सेवेत
By admin | Published: January 12, 2016 2:27 AM