ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. ९ - आयपीएल क्रिकेटचे सामने राज्यात खेळवण्यावरुन सुरु असलेल्या वादावर क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राज्य सरकारला 'महसूल हवा की पाणी' ? हे तुम्हीच ठरवा असं सांगितलं आहे. आयपीएल मॅच दुसरीकडे खेळवण्याचं ठरवल्यास महाराष्ट्र सरकारला तब्ब्ल 100 कोटींचं नुकसान होईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकारला आयपीएल मॅचमधून 100 करोड रुपये मिळणार आहेत. जर मॅचेस दुसरीकडे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर सरकारसाठी हे खुप मोठं नुकसान असेल असं अनुराग ठाकूर बोलले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी चालेल आम्हाला काही फरक पडत नसल्याचं म्हंटलं होत. आयपीएलला पिण्यायोग्य पाणी पुरवणार नसल्याचंही ते बोलले होते यावर उत्तर देताना अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे.
आयपीएलमधून मिळणारा पैसा दुष्काळाचा सामना करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतो असंही अनुराग ठाकूर यांनी सुचवलं आहे. बीसीसीआय काही दुष्काळग्रस्त गावेदेखील दत्तक घेण्याचा विचार करत आहे. तसंच मैदानावर पिण्यायोग्य पाणी वापरणार नसल्याचं आश्वासनही अनुराग ठाकूर दिलं आहे. महाराष्ट्रात आयपीएलच्या 20 मॅचेस होणार आहेत ज्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईत उच्च न्यायालयाने राज्यातील दुष्काळ परिस्थिती पाहता आयपीएल राज्याबाहेर खेळवण्यात यावे असं सुचवलं होतं. न्यायालयाने वानखेडेवर होणा-या सलामीच्या सामन्याला परवानगी दिली असली तरी उर्वरित सामने खेळवायचे की नाही यावर 12 एप्रिलला सुनावणी होणार आहे.