अहमदनगर / श्रीगोंदा : सन २०१४-१५मधील शेतकऱ्यांचे ३८ कोटी २५ लाख रुपयांचे एफआरपीनुसार देयक थकवल्याप्रकरणी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याला (हिरडगाव) श्रीगोंद्याच्या तहसीलदार वंदना खरमाळे यांनी मालमत्ता जप्तीची नोटीस बजावली आहे. मालमत्ता जप्तीसाठी अशा प्रकारे पाच नोटिसा बजावल्यानंतर थकबाकीदारांच्या मालमत्तांवर शासकीय हक्क निर्माण होणार आहे. पाचपुते यांचा साईकृपा साखर कारखाना (हिरडगाव) आर्थिक अडचणीत आहे. कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांना एफआरपीनुसार रक्कम देण्यास असमर्थ ठरला आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकी संदर्भात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कारखान्याची सुनावणी सुरू होती. कारखान्याची मालमत्ता आरआरसी करण्याच्या निर्णयास सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. यामुळे साखर आयुक्तांनी महसूल प्रशासनाला जमीन महसूल अधिनियम कलम २२१नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार श्रीगोंद्याच्या तहसीलदार खरमाळे यांनी साईकृपा कारखाना व्यवस्थापनास १७९ आणि १८० नोटीस बजावली आहे. कारखान्याची सध्याची व्याजासह थकबाकी २९ कोटी ८५ लाखांवर पोहोचली आहे. याापूर्वी आरआरसीच्या आदेशासंदर्भात साखर आयुक्त आणि सहकार मंत्री यांच्या समोर सुनावणी सुरू होती. आता या दोन्ही ठिकाणी थकीत एफआरपीप्रश्नी सुनावणी पूर्ण होऊन आरआरसीचा आदेश अंतिम झाला आहे. यामुळे महसूल खात्याकडून कारखाना जप्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रत्येक नोटिसीला उत्तर देण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
‘साईकृपा’च्या जप्तीसाठी महसूलची नोटीस
By admin | Published: February 28, 2016 1:47 AM