नागपूर : पुण्यातील भोसरी औद्योगिक वसाहतीतील जमीन खरेदीप्रकरणी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी झोटिंग समितीसमोर घुमजाव केले. या जमीन खरेदी व्यवहाराबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे खडसे व त्यांच्या वकिलांनी चौकशी समितीला सांगितले.महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर करून भोसरी येथील जमीन कमी दरात नातेवाईकांना दिल्याचा आरोप खडसेंवर आहे. त्यावरून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या आरोपाच्या चौकशीकरिता २३ जून २०१६ ला न्यायमूर्ती डी. झोटिंग समिती गठित करण्यात आली. समितीने महसूल, उद्योग व एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. उलट तपासणीसाठी खडसेंना प्रत्यक्ष समितीसमोर हजर बुधवारी राहावे लागले. भोसरी येथील जमीन खासगी व्यक्ती असल्याचा दावा खडसे व त्यांचे वकील एम.जी भांगडे यांनी केला. मात्र, एमआयडीसीच्या वकिलांनी त्यावर जोरदार आक्षेप नोंदवला. सदर जागा एमआयडीसी उद्योग विभागाच्या अंतर्गत असतानाही खडसेंनी बैठक घेत जागा देण्याच्या सूचना केल्याचा दावा एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी केला. साक्ष आणि उलटतपासणी बुधवारी पूर्ण झाली असून आता समिती खडसे यांना प्रश्न विचारणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. (प्रतिनिधी)सुनावणी पूर्ण झाल्यावरच बोलणार चौकशी समितीच्या कार्यालयाबाहेर पडल्यावर एकनाथ खडसे यांना पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा हवाला देत सुनावणी पूर्ण झाल्यावरच बोलेन, असे स्पष्ट करीत अधिक बोलण्याचे टाळले.
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे घूमजाव?
By admin | Published: February 23, 2017 4:26 AM