मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील दोन्ही जागा जिंकल्या असल्या तरी याच निवडणुकीवरून विदर्भातील काँग्रेसचे नेते विरुद्ध प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हा संघर्ष तीव्र झाला आहे. पटोले यांनी या निवडणुकीत घातलेल्या गोंधळाबाबत विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असून लवकरच हे नेते दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींची भेटही घेणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही पटोले यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भात काँग्रेससाठी चांगली परिस्थिती असताना पटोले पक्षांतर्गत वितुष्ट आणत असल्याची तक्रार विदर्भातील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. नागपूर विधानपरिषद निवडणुकीत पटोले यांनी आधी गंगाधर नाकाडे आणि नंतर राजेश झाडे यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती. मात्र स्थानिक नेते आणि पदाधिकारी सुधाकर अडबाले यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. तर पटोलेंचा अडबालेंच्या नावाला विरोध असल्याने त्यांनी अडबालेंना एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे विदर्भातील नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन अडबाले यांच्या उमेदवारीची घोषणा केली. नागपूर विधानपरिषद निवडणुकीतही पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित छोटू भोयर यांना पक्षात आणून उमेदवारी दिली आणि ऐन निवडणुकीत भोयर गायब झाले. त्या प्रकरणातही पटोलेंवर पक्षाकडून कारवाई झाली नसल्याचे नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी “आज सकाळी फोन आला, ‘ताई आपण बाळासाहेबांच्या काँग्रेसचे काम करायचे, की नानांच्या?’ आता काय उत्तर देऊ कप्पाळ?” असे ट्वीट करत पक्षातील परिस्थिती समोर आणली आहे.
प्रदेशाध्यक्षांसोबत काम करणे अशक्य - थोरात बाळासाहेब थोरात यांनीही पटोलेंविरोधात पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून प्रदेशाध्यक्षांबरोबर काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. नाशिक विधानपरिषद निवडणुकीतील सत्यजित तांबे यांच्या एबी फॉर्मच्या घोळाचे खापर पटोले यांनी अप्रत्यक्षपणे थोरात यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या थोरातांची पटोले यांच्याविरोधातील नाराजी वाढली आहे.
मी कुरघोडीचे राजकारण करत नाही : पटोलेथोरात यांनी पाठविलेल्या पत्राबाबत आपल्याला माहिती नसल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच, मी कुरघोडीचे राजकारण करत नाही, असे सांगतानाच नागपूर, अमरावती येथे भाजपचा पराभव झाला त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने रचलेला हा खेळ आहे, असा आरोप त्यांनी केला.