पुणे : महापालिका निवडणुकीची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उद्या (सोमवारी) पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केल्या जात असलेल्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीसाठी रणनीतीही निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाकडून येत्या १० आॅक्टोबरला प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे, तत्पूर्वीच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. सकाळी ११ वाजता तटकरे जिल्हातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर दुपारी ४ वाजता ते शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. पक्षाचा जाहीरनामा कसा असावा, कोणत्या मुद्द्यांवर भर द्यावा याबाबत चर्चा करून एकंदरीत निवडणुकीच्या तयारीचा आढावा तटकरे घेणार आहेत. या बैठकीसाठी आजी-माजी आमदार, खासदार, महापौर, नगरसेवक, तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, सर्व सेलचे पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे धोरण ठरविण्यासाठी दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १७ जणांची निवडणूक धोरण समिती जाहीर करण्यात आली आहे. जयंत पाटील, जयदत्त क्षीरसागर, धनंजय मुंडे, भास्करराव जाधव, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, सचिन अहिर, नवाब मलिक, जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, निरंजन डावखरे, संग्राम कोते-पाटील, शिवाजीराव गर्जे यांचा समावेश आहे. निवडणुकांचे जाहीरनामे, प्रचार यामध्ये या समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. (प्रतिनिधी)
निवडणूक तयारीचा आज घेणार आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2016 12:47 AM