देहूगाव : ‘निर्मल वारी’ ही संकल्पना या वर्षी प्रथमच आषाढी वारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची तयारी आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून करण्यात येणाऱ्या प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी श्रीक्षेत्र देहूगावला भेट देऊन पाहणी केली.पालखी मुक्कामाच्या ठिकाणी होत असलेली घाण, पसरणारी दुर्गंधी आणि यामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांचे मूळ असलेल्या शौचालयाच्या समस्येवर गतवर्षापासून उपाययोजनेला सुरुवात केली होती. गतवर्षी ती प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. ही संकल्पना यशस्वी झाल्यानंतर या वर्षी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून निर्मल वारी संकल्पना यशस्वी करण्याचा चंग प्रशासन व काही समाजसेवी संघटनांनी बांधला आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी शासनाने दोन कोटी चार लाख रुपयांची तरतूद करून निर्मल वारी संकल्पना जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीक्षेत्र देहूगाव येथे पहिल्या टप्प्यात ६०० तात्पुरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. ही शौचालये घडी करता येण्यासारखी असतात. त्यामुळे ती सहज व कमी वेळेत लावून उपयोगात आणता येतात. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी तात्पुरती शौचालये लावण्यात येणार असून, त्यासाठी पाण्याची व मैला काढून घेण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे. या शौचालयांच्या गरजेनुसार सहा पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.प्रत्येक ठिकाणी किमान १० शौचालये उभारण्यात येणार असून, त्यासाठी दोन हजार लिटरची पाण्याची टाकी ठेवण्यात येणार आहे. ही शौचालये भरल्यानंतर त्यातील मैला काढून तो पिंपरी-चिंचवडच्या मैलाशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सोडण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जागांचे नियोजन केलेले असून, या जागांवर २४ ते २७ जूनदरम्यान शौचालये लावण्यात येणार आहेत. या जागांच्या पाहणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई आले होते. त्यांनी मुख्य मंदिराचा परिसर, पालखीचा पहिल्या मुक्काम होत असलेल्या मंदिराशेजारील इनामदारवाड्याची पाहणी केली.उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल साकोरे, सरपंच हेमा मोरे, जीवन प्राधिकरणाचे कनिष्ठ अभियंता धनंजय जगधने, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता बाळासाहेब मखरे, ग्रामपंचायत सदस्य राणी मुसुडगे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
‘निर्मल वारी’च्या तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2016 12:51 AM