पिंपरी : छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या २५ कलमी कार्यक्रमाची पोलीस यंत्रणेकडून प्रभावी अंमलबजावणी होत नाही, याबाबतचे वृत ‘लोकमत’ने रोडरोमिओंमुळे विद्यार्थिनी असुरक्षित या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या वृत्ताची सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके गंभीर दखल घेऊन सोमवारी सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. तसेच सर्व महाविद्यालयांमध्ये आठवडाभरात तक्रार पेट्याही बसविण्यात येणार आहेत.पोलीस आयुक्तांनी महाविद्यालय परिसरामध्ये टवाळखोरांकडून होणाऱ्या छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी २५ कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमानुसार संबंधित पोलीस ठाण्यातील बीट मार्शल यांनी आठवड्यातून दोनदा शाळा-महाविद्यालयांना भेटी द्याव्यात. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनीही विद्यार्थिनींची स्वतंत्र बैठक घ्यावी आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये मुलींसाठी तक्रार पेट्याही ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानादेखील या २५ कलमी कार्यक्रमाची शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तात प्रसिद्ध झाले होते. या संदर्भात पिंपरी पोलीस विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मांडुरके म्हणाले, ‘‘त्यांनी महाविद्यालयातील गस्तीसंदर्भात येत्या सोमवारी सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची आणि चौकी अमंलदारांची बैठक बोलावली आहे. शहरातील महत्त्वाच्या महाविद्यालयांत भेट देणार असून, सर्व आठवडाभरात तक्रार पेट्या बसविण्यात येणार आहेत.’’ (प्रतिनिधी)
सहायक उपायुक्त घेणार आढावा
By admin | Published: July 23, 2016 1:54 AM