मुंबई - राज्य सरकारमधील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार तसेच जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचे खोळंबलेले वाटप यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभा करत अजित पवार हे जुलै महिन्याच्या सुरुवातीला अनेक आमदारांना सोबत घेत महायुती सरकारमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला होता. त्यावेळी अजित पवार गटाला ९ मंत्रिपदे मिळाली होती. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा तसेच कायदेशीर पेचप्रसंग यामुळे पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांचंही वाटप होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेरीस आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांचं वाटप करत सुधारित यादी जाहीर केली आहे.
सुधारित यादीमध्ये अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. तर पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे आता सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अकोला, दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे बुलढाणा, हसन मुश्रिफ यांच्याकडे कोल्हापूर, धनंजय मुंडे यांच्याकडे बीड, अनिल पाटील यांच्याकडे नंदूरबार जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील