पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पुढे ढकलण्यात आलेल्या विविध परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 'राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०' येत्या १३ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन एमपीएससीतर्फे एप्रिल-मे २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. परंतु ,राज्य शासनातर्फे बहुतांश गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकललेल्या तीन परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ' राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०' येत्या १३ सप्टेंबर रोजी तर ' महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०' येत्या ११ ऑक्टोबर रोजी आणि ' महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०' येत्या १ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.-----------------पुण्यासह विविध शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी कोरोनामुळे आपल्या गावी गेले आहेत. त्यातील अनेक विद्यार्थ्यांनी पुणे हे परीक्षा केंद्र निवडले आहे. परंतु , विद्यार्थ्यांना आपल्या गावाजवळील परीक्षा केंद्रांमध्ये परीक्षा देता यावी, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केंद्र बदलाची सुविधा उपलब्ध करून द्यावी ,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.