सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील शेत जमिनीसह अन्यही जमीन मालकी हक्काचे ब्रिटीश कालीन दस्तऐवज जीर्ण झाले आहेत. ही कागदपत्रे हाताळेही अशक्य झाले आहे. या सुमारे ५२ लाख दस्तऐवजांचे महत्त्व लक्षात घेऊन ते टिकवणे आवश्यक आहे. यामुळे या कागदपत्रांकाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्कॅनिंग करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी खास कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.तहसिलदार कार्यालयाच्या ताब्यातील कागदपत्रकांसह भूमि अभिलेख विभागाच्या अखत्यातील अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज याच पध्दतीने स्कॅन करून त्यांचे जतन करण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात येत आहे. ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्णास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ब्रिटीश राजवटीच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या कालावधीतील जमिनी संबंधीच्या संपूर्ण ‘फेरफार नोंदी’ ‘स्कॅनिंग’ तंत्राचा वापर करून जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.ठाणे जिल्ह्णात खास सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम राज्य सरकारच्या वतीने युध्दपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून तहसीलदार व भूमि अभिलेख विभागाच्या आखत्यातील दस्तऐवज स्कॅन करण्यात येत आहे. यामध्ये जमीनीचे कायम दस्तऐवज, सातबारा, फेरफार नोंदींसह ब्रिटीश कालीन जमीन एकत्रीकरण योजनेचे कागदपत्र, टिपण, जमिनीचा आकार बंध आदी दस्तऐवज जतन करण्यासाठी स्कॅनिंग तंत्राचा वापर केला जात आहे. सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत ‘कारवी’ या खाजगी कंपनीकडून नवनविन तंत्राचा वापर करून या कागदपत्रांचे जतन करण्यात येणार आहे. त्यानंतर हे दस्तऐवज आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दस्तावेज कोणालाही सहज अभ्यासता येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक पध्दतीचे सॉफ्टवेअर विकसीत केले जात आहे.
जीर्ण दस्तावेजांना नवजीवन
By admin | Published: February 25, 2015 2:23 AM