भिवंडी : यंत्रमागांना देण्यात येणाऱ्या सबसिडीत ३० टक्क्यांनी केलेली वाढ, कामगारांना विश्रांतीकरिता व निवासाकरिता व्यवस्था करण्याची केलेली तरतूद, ११ जणांनी एकत्र येऊन यार्न बँकेची स्थापना करण्याची असलेली तरतूद आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून कर्ज देताना केवळ चार टक्के व्याजदराने परतफेड करण्याची सोय, यामुळे देशात यंत्रमाग क्रांती होईल, असा विश्वास केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी व्यक्त केला.यंत्रमाग उद्योगाकरिता आखलेल्या पॉवर टेक्स इंडिया या देशव्यापी योजनेचा शुभारंभ भिवंडीतून झाला. त्या वेळी स्मृती इराणी बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या वेळी उपस्थित होते. पॉवर टेक्स इंडियामुळे देशातील यंत्रमागाला संजीवनी प्राप्त होऊन या उद्योगाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.इराणी म्हणाल्या की, विजेची कमतरता लक्षात घेता यंत्रमागधारकांनी सौरऊर्जेचा वापर केला तर भविष्यात भारत ऊर्जा क्षेत्रात संपन्न होईलच; पण यंत्रमागधारकांनाही लाभ होईल. देशातील ४५ टक्के कापड महाराष्ट्रात तयार होते. त्यापैकी जास्त उत्पादन भिवंडीत घेतले जाते. त्यामुळे योजनेचा प्रारंभ इथे करताना आनंद होत आहे.देशातील सुरत, बनारस, भागलपूर, बंगळुरू, वाराणसी, कोल्हापूर, बऱ्हाणपूर अशा ४३ यंत्रमाग शहरांतील मालक व कामगारांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभागी करून घेतले होते. इराणी व फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना योजनेची माहिती दिली. खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, वस्त्रोद्योग राज्यमंत्री सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता आदी या वेळी उपस्थित होते. इराणी म्हणाल्या की, यंत्रमाग उद्योगाला संजीवनी देण्याकरिता असलेल्या या योजनेत शासन एक लाख रुपयांचा मार्जीन मनी देईल. या सर्व योजना त्वरित व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेबसाइटबरोबरच लवकर पॉवर टेक्सचे मोबाइल अॅप काढण्यात येईल. यंत्रमाग क्षेत्राला ऊर्जितावस्था देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वस्त्रोद्योग विभागाने तयार केलेली ही योजना देशात नवा इतिहास रचेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. याची सुरुवात भिवंडीसारख्या यंत्रमागाच्या राजधानीतून होते आहे, ही आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. यापूर्वी १००० कोटींची वीज सबसिडी दिली जात होती. ती आमच्या सरकारने अलीकडेच १५०० कोटी केली आहे. म्हणजे जवळजवळ ५० टक्के वाढ केली आहे. यासंदर्भात एका योजनेवर आम्ही काम करीत असून, लवकरच त्यातील निर्णय जाहीर करण्यात येतील, असेही फडणवीस म्हणाले. (प्रतिनिधी)
‘पॉवर टेक्स इंडिया’ यंत्रमाग क्षेत्रात क्रांती
By admin | Published: April 02, 2017 1:36 AM