मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस येऊन ठेपल्याने मुंबईत अनेक दिग्गजांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. शिवसेनेचे दिग्गज नगरसेवक नाना उर्फ संजय आंबोले, गोवंडीचे नगरसेवक बबलू उर्फ दीपक पांचाळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला आहे. तर वरळी, लालबागसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दिलेल्या उमेदवारीमुळे प्रथमच शिवसैनिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता उमेदवारीच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेला आणखी किती धक्के बसणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.उमेदवारांची यादी जाहीर न करता रातोरात एबी फॉर्म वाटून बंडोबांना गाफील ठेवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न अखेर फसला. उमेदवारांची पहिलीच गोपनीय यादी सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने शिवसेनेला बंडाळीचा चांगलाच दणका बसला आहे. वडाळा येथील नाराज शिवसैनिकांनी तर चक्क शाखेला टाळे लावून रस्त्यावर निदर्शन केली. तर नाराज आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाबरोबर युती तुटल्यामुळे सेना स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. यामुळे इच्छुकांची फौज वाढली. राखीव प्रभागात पत्नीला उमेदवारी मिळण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांनी जोर लावला. मात्र आपला पत्ता कापला जाण्याची कुणकुण लागल्याने शिवसेनेत धुसफूस सुरू झाली. त्यामुळे बंडाळी टाळण्यासाठी यादी जाहीर न करता विभाग प्रमुखांमार्फत उमेदवारांना बुधवारी रात्रीच एबी फॉर्म वाटण्यात आले. मात्र यादी फुटली आणि नाराजांनी बंडाचे निशाण फडकावले. सरवणकरविरुद्ध शाखाप्रमुख प्रभाग १९४ मधून शिवसेना नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. यामुळे नाराज माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेकडे गेलेला दादर माहीम विभाग खेचून आणण्याचे मनसुबे आखणाऱ्या शिवसेनेला यामुळे झटकाच लागला आहे. शेवाळेंविरुद्ध नगरसेवकाचे बंडअणुशक्ती नगर प्रभाग १४४ मधून इच्छुक नगरसेवक बबलू पांचाळ यांना डावलून खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी व माजी नगरसेविका कामिनी शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पक्षाने डावल्यानंतर शेवाळेही असेच बंडखोरी करीत निवडून आले होते. पांचाळ यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर माजी सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनीही भाजपात आज प्रवेश केला.आंबोलेंच्या शाखेत मात्र जल्लोषपरळमधील शिवसेनेचे पॉवरफुल नगरसेवक नाना आंबोले यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी शिवसैनिकांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसले नाही. सिंधू म्हसूरकर या अतिशय जुन्या कार्यकर्तीला वॉर्ड २०३मधून तिकीट मिळाल्याने शिवसेना शाखेत फटाक्यांच्या जोरदार आतशबाजीसह जल्लोष केला.वडाळ्यात शाखेला टाळे आपल्या उमेदवाराला डावलून युवा सेनेचे पदाधिकारी अमेय घोले यांना तिकीट दिल्याने स्थानिक विभाग संघटक माधुरी मांजरेकर यांच्या समर्थकांनी वडाळा प्रभाग १७८ला टाळे लावले. मांजरेकर समर्थकांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. आजी-माजी महापौरांचे नाट्यमाजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी शिवसेनेचा एबी फॉर्म नाकारल्याची चर्चा आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा फॉर्मही वादात अडकला आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांना नको असलेल्या १९५ प्रभागातून उमेदवारी देण्यात आली.गणेशगल्लीत शिवसैनिक रस्त्यावर प्रभाग २०४मधून अनिल कोकीळ यांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिक मोठ्या संख्येने गणेशगल्लीतील शाखेत जमा झाले. या उमेदवारीमुळे शिवसैनिकांत मोठी नाराजी असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.उमेदवार नाकारले... स्थानिक शिवसैनिक, शाखाप्रमुखांचा विरोध डावलून वॉर्ड १९९मधून विद्यमान नगरसेविका किशोरी पेडणेकरांना उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. हेच चित्र प्रभाग १९६मध्ये आहे. विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांना १९६मधून उमेदवारी दिल्याने शाखाप्रमुख जिवबा केसरकर नाराज आहेत.
आयारामांना उमेदवारीमंगेश सांगळे ( प्रभाग ११८ ) मकरंद नार्वेकर (प्रभाग २२७ ) हर्षदा नार्वेकर ( प्रभाग २२६ ) सुखदा पवार (प्रभाग ९३)