मुंबई : राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प महत्त्वाचा असून, यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर भार येणार नसल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी विधानपरिषदेत सांगितले. शिवाय, या प्रकल्पासाठी संपादित जमिनींना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे प्रकल्पाच्या मार्गावरील आदिवासी पट्ट्यात उद्योगधंदे उभे राहतील, तसेच हा मार्ग मुंबई ते ठाण्यापर्यंत जमिनीखालून जाणार असल्याने, शेतकºयांची जमीन जास्त प्रमाणात संपादित होणार नाही. मात्र, भूसंपादन झालेल्या शेतकºयांना समृद्धी महामार्गाप्रमाणे योग्य मोबदला मिळेल, असे रावते यांनी सांगितले.बुलेट ट्रेनचा हा प्रकल्प सुमारे एक लाख कोटी रुपयांचा असून, त्यासाठी ८० टक्के कर्ज जपानी बॅँकेकडून मिळणार आहे, तर २० टक्के हिश्श्यापैकी केंद्र सरकार १० टक्के, तर उर्वरित १० टक्के हिस्सा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा असणार आहे. जपानी बॅँकेचे कर्ज ५० वर्षांसाठी असून, पहिल्या १० वर्षांसाठी कर्जफेड करावी लागणार नाही, तसेच राज्याला सुरुवातीला १२५ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी माहिती रावते यांनी दिली. या बुलेट ट्रेनचे भाडे विमानाच्या तिकिटापेक्षा दीडपट असेल. मात्र, विमानाने जाण्या-येण्यात जो संपूर्ण वेळ जातो, त्यापेक्षा ही ट्रेन लवकर पोहोचणार आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातली जमीन देण्यात आलेली नाही. संकुलातली चाळीस हजार वर्गमीटर जमीन देण्याचा सरकारचा विचार आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर यांनी केलेला आरोप रावते यांनी फेटाळून लावला.मुंबई-कोलकाता बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिक-औरंगाबाद-अमरावती -नागपूरमार्गे नेण्यात यावा, अशी केंद्र सरकारला सूचना करण्यात आली असून, याचे सर्वेक्षण स्पॅनिश कंपनीकडून सुरू असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे संजय दत्त यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित करत, प्रकल्प फक्त धनदांडग्यांसाठी असल्याचा आरोप केला होता.नीलम गोऱ्हे यांचा रावतेंना सवालएकीकडे दिवाकर रावते बुलेट ट्रेनची आवश्यकता सांगत असताना, शिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी मात्र, हा प्रकल्प म्हणजे मराठी नागरिकांच्या हितावर अंधारात मारलेली कुºहाड असल्याचा आरोप केला. बुलेट ट्रेनवाल्यांसाठी पार्किंगची सोय कुठे करणार, मुंबईत आधीच घरे महाग आहेत. बुलेट ट्रेनऐवजी दुसरा काही पर्याय आहे का, असे विचारत, फक्त हिरे व्यापाºयांच्या सोयीसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘बुलेट ट्रेन’साठी ‘समृद्धी’सारखा मोबदला - रावते यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 3:59 AM