डोंबिवली : महिला होमगार्ड सुनीता मेहर (२७) यांचे रविवारी अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला रिक्षाचालक रवी गुप्ता याला सोमवारी कल्याण न्यायालयाने २३ तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण-डोंबिवली शहरांत रिक्षाचालकांची मुजोरी सुरूच आहे. डोंबिवलीच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या मेहर रविवारी दुपारी १२ च्या सुमारास पूर्वेला रेल्वे स्थानक परिसर व रामनगर पोलीस ठाण्यासमोरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम करीत होत्या. त्या वेळी गुप्ता भररस्त्यात रिक्षा आडवी उभी करून प्रवाशांना बोलवत होता. त्याला मेहर यांनी रिक्षा बाजूला घ्या, तुमच्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. त्याचा इतरांना तसेच रहदारीला त्रास होत आहे, असे सांगितले. त्यामुळे गुप्ताने त्यांच्याशी हुज्जत घातली. यामुळे मेहर यांनी रिक्षात बसवून रिक्षा पोलीस ठाण्यात घेण्याचे सांगितले. परंतु, गुप्ताने रिक्षा ठाकुर्लीच्या दिशेने पळवली. मेहर यांनी त्याला रिक्षा थांबवण्यास सांगितले. त्याने रिक्षा थांबवत त्यांना मारहाण केली. मेहर यांनी आरडाओरडा केल्याने नागरिक तेथे जमले. त्यामुळे त्याने मेहर यांना नाल्यात फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी रविवारी सायंकाळी गुप्ताला अटक केली. (प्रतिनिधी)
‘त्या’ रिक्षाचालकास तीन दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: March 21, 2017 3:34 AM