चार वर्षांनी गुन्हा उघड : परदेशी नागरिकांची बनावट कार्डे बनवून लुटले घबाडजयेश शिरसाट - मुंबईनायजेरियन भामट्यासोबत शहरातल्या एका रिक्षाचालक व नाभिकाने परदेशातील खातेदारांच्या बँक खात्यातले तब्बल १ कोटी ६५ लाख रुपये परस्पर स्वत:च्या खिशात घातले. सायबर पोलिसांनी या टोळीतल्या तिघांना अटक केली खरी; पण त्यांच्या कारस्थानाचा फटका बँक आॅफ इंडियाला बसला आणि बँकेला ही रक्कम त्या-त्या परदेशी नागरिकांना परत करावी लागली. चौकशीदरम्यान या टोळीने फसवणुकीसाठी आखलेला कट उलगडला आणि सायबर पोलीसही थक्क झाले. अशा प्रकारचा मुंबईतला हा पहिला मोठा गुन्हा असल्याचे सायबर पोलीस सांगतात.फैयाज कासिम शेख, अमीर अन्सारी आणि जाफर कासिम सय्यद अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी फैयाज रिक्षाचालक तर अमीर नाभिक आहे. दोघेही काही काळ मीरारोडला वास्तव्यास होते. तेथेच त्यांची ओळख एका नायजेरियन भामट्याशी झाली. तिथून बँक, परदेशी नागरिकांच्या फसवणुकीचा कट आखला गेला. युरोप, अमेरिकेतील नागरिकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डांचे तपशील चोरणारे आणि ते अन्य देशांतील अशा टोळ्यांना विकणारे या नायजेरियन तरुणाच्या संपर्कात होते. त्याने हे तपशील विकत घेतले आणि त्याआधारे मुंबईत बनावट डेबिट, क्रेडिट कार्ड तयार केली. त्याआधी त्याने संजय राम तिवारी या नावाने फैयाजचे पॅनकार्ड, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स तयार केली. त्याआधारे फैयाजने संजयच्या नावे वांद्र्याच्या लिंक स्क्वेअर मॉलमध्ये एक गाळा भाड्याने घेतला. तेथे मेसर्स गोल्ड अॅण्ड डायमंड या नावाने शोरूम सुरू केले. भाडेकराराच्या आधारे फैयाज ऊर्फ संजयने शोरूमच्या नावे बँक आॅफ इंडियात खाते उघडले. तसेच व्यवहारासाठी बँकेतून इलेक्ट्रॉनिक डाटा कॅप्चर मशिन (ईडीसी - डेबिट कार्ड ज्या यंत्रात स्वाइप केले जाते) घेतले. या ईडीसी मशिनमध्ये परदेशी नागरिकांची बनावट कार्डे स्वाइप केली गेली. स्वाइप केल्यानंतर परदेशी नागरिकांच्या खात्यातून रक्कम वजा झाली. ती बँक आॅफ इंडियातील फैयाज ऊर्फ संजयच्या खात्यात पडली. पुढे या टोळीने ही रक्कम काढून आपापसांत वाटून घेतली. यापैकी ८० टक्के रोकड म्हणजे सुमारे सव्वा कोटी रुपये नायजेरियन भामट्याने घेतले. उर्वरित या तिघांना मिळाली.धक्कादायक म्हणजे चार वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला. २०१३मध्ये व्हिसा मास्टर कार्ड कंपनीने बँक आॅफ इंडियाला मेसर्स गोल्ड अॅण्ड डायमंडच्या खात्यातून झालेले १ कोटी ६५ लाखांचे व्यवहार संशयास्पद असल्याची माहिती दिली. त्यानंतर बँकेने या कंपनीचा तथाकथित मालक संजयचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा संजयने दिलेला पत्ता, खाते उघडण्यासाठी दाखल केलेली कागदपत्रे सर्वच बनावट असल्याचे बँकेच्या लक्षात आले. इतकेच नव्हे तर स्क्वेअर मॉलमधील शोरूमही केव्हाचेच बंद झाल्याचे समजले. डेबिट, क्रेडिड कार्डांच्या व्यवहारांमधील नियमांनुसार व्हिसा मास्टर कार्ड कंपनीने ज्या परदेशी नागरिकांच्या खात्यातील रोकड या टोळीने काढली होती त्यांना ती परत केली. तसेच ही रक्कम बँकेकडून वसूल केली. परदेशी नागरिकांनी आपल्या कार्डावरून भारतात खरेदी झाली; मात्र आम्ही भारतात गेलोच नाही, अशा तक्रारी केल्या तेव्हा व्हिसा मास्टरकार्ड कंपनीची ट्युब पेटली आणि सर्व प्रकार उजेडात आला. तोपर्यंत मेसर्स गोल्ड अॅण्ड डायमंड शोरूममधून सुरू असलेले व्यवहार वैध असल्याचे बँकेला वाटत होते.नायजेरियन भामट्यांचे पाय घट्ट : स्टुडंट, बिजनेस व्हिसावर किंवा अवैध मार्गे भारतात येणाऱ्या नायजेरियन तरुणांनी मुंबई, महाराष्ट्रातल्या गुन्हेगारीत आपले पाय किती घट्ट रोवले आहेत याचा अंदाज सायबर पोलिसांनी केलेल्या एका कारवाईतून येऊ शकतो. या नायजेरियन तरुणाने मुंबईतला एक रिक्षाचालक, नाभिकाला सोबत घेऊन बँक आॅफ इंडियाला तब्बल दीड कोटींचा चुना लावला. त्यातली सव्वा कोटींची रोकड घेऊन तो पसार झाला आणि त्याला या गुन्ह्यात मदत करणारे रिक्षाचालक अणि नाभिक मात्र अडकले. या गुन्ह्यासाठी आवश्यक असलेल्या परदेशी नागरिकांची बनावट डेबिट, क्रेडिट कार्डांपासून फैयाजचे संजय या नावे बँक आॅफ इंडियात खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली सर्व बनावट कागदपत्रे या नायजेरियन तरुणानेच बनवून घेतली होती. सायबर पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.बँक आॅफ इंडियाने २०१३मध्ये या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली. एसीपी नंदकिशोर मोरे, वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर व तपास अधिकारी निरीक्षक दिनकर शिलवटे यांनी तपासाला सुरुवात केली. त्यांच्याकडे केवळ बनावट कागदपत्रे होती. पुरावा नसताना अत्यंत चिकाटीने तपास करून त्यांनी तिघांना गजाआड केले.
रिक्षाचालकाचा बँकेला दीड कोटीचा गंडा!
By admin | Published: January 04, 2015 2:37 AM