- कुलदीप घायवट । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत झालेल्या १९९१ सालच्या दंगलीनंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तब्बल २६ वर्षांनी आपला व्यवसाय सांभाळत ४२ वर्षीय रिक्षाचालक दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रूकसार हीदेखील प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. मुलुंड येथील रिक्षाचालक मोहम्मद शरीफ अब्दुल खान यांनी वयाच्या ४२व्या वर्षी दहावीची परीक्षा देऊन ५१ टक्के गुण मिळवले आहेत. शिक्षण मध्येच सोडायला लागल्याची खंत होती. त्यामुळे व्यवसाय सुरू ठेवून त्यांनी उरलेल्या वेळात अभ्यास सुरू केला. यासाठी त्यांच्या घरच्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या मुलीने मोहम्मद यांना अभ्यासात मार्गदर्शन केले होते. खान यांनी विक्रोळीच्या राजपाल विद्यालयातून १७ नंबरचा अर्ज भरून अभ्यास सुरू केला. आता दहावी पास झाल्यावर ते इथेच थांबणार नाहीत. ते पुढे अजून शिकणार आहेत, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.