ठाणे : अपघातानंतर चालकांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईक जगन्नाथ कोळी यांना दारूच्या नशेत असलेल्या रिक्षाचालक व त्याच्या साथीदाराने धक्काबुककी केली, तर रिक्षाचालकाने त्यांच्या हाताचा चावा घेतला. या प्रकरणी रिक्षाचालकास अटक के ली. मात्र, त्याचा साथीदार फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.मुलुंड येथील अटक रिक्षाचालक अभिराम चौहान, तर त्याचा फरार साथीदार समाधान हे दोघे रिक्षाने जात होते. याचदरम्यान, त्यांची रिक्षा आणि एका कारचा घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नलजवळ अपघात झाला. त्यानंतर, दोन्ही चालकांमध्ये रस्त्यामध्ये वाद होऊन भांडण सुरू होते. या वेळी पेट्रोलिंग करीत असलेले कोळी आणि साळवी तेथून जात होते. त्यांनी तो प्रकार पाहून त्यांच्यातील वाद मिटविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच त्यांनी वाद न करता पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचीही विनंती चालकांना केली. त्या वेळी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराने कोळींना धक्काबुक्की करून दारूच्या नशेत असलेल्या चौहानने कोळींच्या उजव्या हाताचा चावा घेतला. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत रिक्षाचालक चौहानला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
पोलिसाच्या हाताचा चावा घेणारा रिक्षाचालक गजाआड
By admin | Published: November 23, 2015 2:01 AM