विशाल शिर्के । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : रिक्षाचालक भाडे नाकारतात... हुज्जत घालतात... जादा भाडे घेतात... अशा प्रवाशांच्या तक्रारी वरचेवर ऐकायला येत असतात. बहुतांश प्रवाशी रिक्षाचालकांचा मुजोरपणा सहन करून गप्प बसतात. काही पुणेकरांनी पुढे येत अशा रिक्षाचालकांची प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) तक्रार करीत त्यांना अद्दल घडविली आहे. त्यामुळे ६९५ रिक्षाचालकांवर गेल्या १४ महिन्यांत कारवाई करण्यात आली असून, त्यातील ६३२ रिक्षाचालकांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच त्यांना ३ लाख ५७ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. रिक्षाचालक आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काही चालकांच्या वर्तनाबद्दल अनेकदा बोलले जाते. त्यांच्या विपरीत वर्तनाचा अनुभवदेखील अनेक नागरिकांनी घेतला असेल. मात्र, अशा प्रवृत्तीला चाप बसविण्यासाठी कोणी फारसे पुढे येत नाही. काही प्रवाशांनी पुढे येत आरटीओकडे तक्रार करून संबंधित रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या आर्थिक वर्षात रिक्षाचालकांविरुद्ध ४२९ नवीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या पूर्वीच्या प्रलंबित तक्रारी धरून ५९५ रिक्षाचालकांचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे ३७ आणि २१ रिक्षाचालकांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तडजोड शुल्कापोटी त्यांच्याकडून २७ हजार ८०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. दरमहा सरासरी ३५ तक्रारी आरटीओकडे दाखल होत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जानेवारी महिन्यात सर्वांत कमी १३ नवीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. मे आणि आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक प्रत्येकी ५३, त्या खालोखाल एप्रिल महिन्यात ५१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. म्हणजेच उन्हाळी सुट्टीचा काळ तक्रारींचा महिना राहिला आहे. भाडे नाकारणे, जास्त भाडे आकारणे, उद्धट वर्तन आणि मीटर फास्ट असल्याच्या तक्रारी आरटीओकडे दाखल करण्यात आल्या होत्या. या विषयी माहिती देताना आरटीओचे सहायक परिवहन अधिकारी सर्जेराव पवार म्हणाले, ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यात दोषी आढळल्यास रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. भाडे नाकारणे, ज्यादा भाडे घेणे, मीटर फास्ट असणे आणि उद्धट वर्तनासाठी पाचशे रुपयांचा दंड आकारला जातो. मीटर फास्ट नसल्याचे नाकबुल केल्यास त्याची चाचणी घेऊन, संबंधितावर परवाना निलंबनाची कारवाई केली जाते. कबुल केल्यास तातडीने दंड करून, त्यात दुरुस्ती करण्यास सांगण्यात येते. ।वर्तनाची तक्राररिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे, ज्यादा भाडे घेण्याचे आणि उद्धट वर्तनाचे प्रकार घडल्यास प्रवाशांनी १८००२३३००१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओ कार्यालया कडून करण्यात आले आहे.
प्रवाशांचा रिक्षाचालकांना दणका
By admin | Published: June 09, 2017 12:43 AM