मुंबई : राज्यातील आॅटोरिक्षा आणि टॅक्सीचे भाडे ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीतर्फे ग्राहक, रिक्षा व टॅक्सीचालक, आॅटोरिक्षा व टॅक्सी युनियन यांच्याकडून भाडेदरासंदर्भात आॅनलाइन अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानुसार १५ मेपर्यंत आलेल्या सूचनांच्या सर्वेक्षणानंतरच आॅटोरिक्षा आणि टॅक्सीचे भाडेदर सूत्र ठरविले जाईल, अशी माहिती आॅटोरिक्षा व टॅक्सी भाडेदर सूत्र समितीचे अध्यक्ष बी. सी. खटुआ आणि राज्य परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.नरिमन पॉइंट येथील एमएमआरडीएच्या कार्यालयात शनिवारी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील आॅटोरिक्षा/टॅक्सी भाडेसूत्र ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने विविध ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. मात्र, समितीला विविध मुद्द्यांवर रिक्षा तसेच टॅक्सीचालक, रिक्षा व टॅक्सी युनियन आणि ग्राहक यांच्या मतांमध्ये भिन्नता आढळली आहे. त्यामुळे या सर्वांची मते विचारात घेतल्यानंतर व्यापक प्रमाणावर आॅटोरिक्षा व टॅक्सी व्यावसायिक, त्यांच्या संघटना, तसेच प्रवाशांना भाडेवाढीसंदर्भातील त्यांची मते समितीकडे मांडता यावीत, यासाठी आॅनलाइन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १५ मेपर्यंत प्रवाशांसह आॅटोरिक्षा आणि टॅक्सीचालक, संघटनांनी अभिप्राय नोंदवावेत, असे सांगण्यात आले आहे. या अभिप्रायानंतरच रिक्षा-टॅक्सींचे दर ठरवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अभिप्राय नोंदविण्यासाठीचे अर्ज उपलब्ध आहेत. एक व्यक्ती फक्त एकच अभिप्राय देऊ शकेल. सर्वेक्षणामध्ये चार प्रकारचे अर्ज आहेत. ते पुढीलप्रमाणे :१. जनतेचा अभिप्राय२. आॅटोरिक्षा चालक अभिप्राय३. टॅक्सीचालक अभिप्राय४. आॅटोरिक्षा/टॅक्सी संघटनांचा अभिप्राय ई-व्हेईकल्ससोबतही स्पर्धा- आॅटोरिक्षा आणि टॅक्सींची सध्या ओला-उबरसोबत स्पर्धा सुरू आहे. येत्या काळात रिक्षा-टॅक्सींना ई-व्हेइकल्ससोबतसुद्धा स्पर्धा करावी लागणार आहे. त्यासाठी रिक्षा-टॅक्सींचे भाडेदर नियंत्रित असणे, त्यांचा दर्जा उत्तम असणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून हे सर्वेक्षणही तितकेच गरजेचे आहे, अशी माहिती अॅटोरिक्षा/टॅक्सी भाडेदर सूत्र समितीने दिली.फसवणूक होणार नाहीआॅटो रिक्षासह टॅक्सी, ओला, उबर, शेअर टॅक्सी, शेअर रिक्षा या सर्वांसाठी भाडे दर ठरवून दिले आहेत. परिणामी प्रवाशांची फसवणूक होणार नाही, असे समितीने सांगितले.जून अखेरीस सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून शासनाकडे सुपुर्द करण्यात येईल. त्यानंतरच निर्णय घेण्यात येतील. भाडेदर आणि भाडेदराची तत्त्वे ठरविण्यासाठी आम्ही अभिप्राय मागवीत आहोत.- प्रवीण गेडाम, राज्य परिवहन आयुक्त
आॅनलाइन सर्वेक्षणानंतर ठरणार रिक्षा-टॅक्सीचे दर
By admin | Published: April 30, 2017 3:20 AM