गेल्या काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये निर्माण झालेल्या मतभिन्नतेमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या कळीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र आता या भेटीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंकडे आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला, अशी टीका शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओकवर झालेल्या भेटीवरून टीका करताना केलेल्या ट्विटमध्य़े शीतल म्हात्रे म्हणाल्या की, लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी, उद्धव ठाकरेंकडे आडनावाचा वारसा आला पण स्वाभिमानाचा वारसा नाही आला. कधीही कुणाच्या दारी न गेलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा खाली मान घालून पवारांच्या घरी गेला. पक्ष गेले, चिन्ह गेले आणि आता स्वाभिमानही गेला, अशी खोचक टीका शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, शीतल म्हात्रे यांनी आणखी एक ट्विट करून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली असल्याचा दावाही या भेटीवरून केला आहे. एक नाव आणि चिन्ह नसलेला पक्ष, नुकताच प्रादेशिक झालेल्या दुसऱ्या पक्षाचे सात्वंन करण्यास गेला आहे. आघाडी मध्ये बिघाडी झाल्याची चर्चा??? All is NOT well? असेही ट्विट त्यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्रवीर सावरकरांचा अवमान, गौतम अदानी प्रकरणााची जेपीसी चौकशी, ईव्हीएमचा मुद्दा आणि पंतप्रधान मोदींच्या पदवीचा विषय या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीमधील ठाकरे गट, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद दिसून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमधील ऐक्याला तडे गेले आहेत की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये आज मोठी घडामोड घडलीय. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे हेसुद्धा उपस्थित होते.