Balasaheb Thorat Nana Patole, Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये काही दिवसांपासून दुफळी किंवा फूट पडल्याचे बोलले जात होते. याच दरम्यान, राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. काही दिवसांपूर्वी आपले राज्याचे पक्षाध्यक्षपद सोडणारे बाळासाहेब थोरात यांनी आज विधिमंडळ पक्षनेते पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. भाजपा आणि बाळासाहेब थोरात यांच्यात जवळीक वाढल्याचे बोलले जात होते. तशातच या प्रकार घडला असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. आता या गोंधळावरुन काँग्रेस नेतेबाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले होते. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन गटबाजी समोर आली होती. त्यामुळेच हा राजीनामा दिल्याचे बोलले जात होते. आता या प्रकरणी काँग्रेस हायकमांड कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविषयी एक धक्कादायक खुलासा केला आहे. बाळासाहेब थोरातांशी आमचा संपर्क होत नाही, ते आमच्याशी बोलतच नाहीत, असा खुलासा नाना पटोलेंनी केला.
गेल्या महिन्यात नागपूरमध्ये काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. आता १५ फेब्रुवारीला आणखी एक बैठक होणार आहे. आता झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला जे यश मिळाले त्यानंतर आम्ही नव्या जोमाने उभे राहणार आहोत. भाजपाने जनतेचा विश्वासघात केला. बेरोजगारी, महागाई, आत्महत्या अशा गोष्टी बाबी भाजपामुळे वाढल्या. पण मूळ मुद्द्यांना बगल देण्याची त्यांची भूमिका आहे, असे नाना पटोले यांनी नमूद केला.
"आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही. काही प्रसारमाध्यमांमध्ये काँग्रेसबद्दल अनेक बातम्या चालवल्या जात आहेत. पण भाजपामध्येही कलह दिसत असून, त्यावर काहीच बोलले जात नाही. बाळासाहेब थोरातांचे पत्र तुम्ही आम्हाला दाखवा. बाळासाहेब थोरात आमच्यासोबत बोलतच नाहीत. ते तुमच्याशी बोलत असतील तर तुम्हीच विचारा. त्यांची प्रकृती उत्तम नसल्याने आमचा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. हे राजकारण आहे. काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे. संवैधानिक व्यवस्थेसाठी लढणारा पक्ष आहे. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या दृष्टीने काम करतो आहे. पण कोणालाही आयते बसून काही गोष्टी हव्या असतील तर तो त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही," असे नाना पटोले म्हणाले.