कोल्हापूर : डाव्यांनी वेळोवेळी बेइमानी केल्यानेच उजवे माजले आहेत. डाव्यांचा प्रभाव वलय नाहीसा झाल्यानेच उजव्यांकडून विचारवंतांच्या हत्या होत आहेत, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांनी रविवारी व्यक्त केले. येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये आयोजित बहुभाषिक राष्ट्रीय परिषदेत ‘अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने पडेंगे’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डाव्या विचारसरणीच्या व्यासपीठावरून खान यांनी डाव्यांच्या चुकीच्या मानसिकतेवर अतिशय जहाल शब्दांत प्रहार केला. खान म्हणाले, बहुतांश समाजवादी आणि डाव्या लोकांत ढोंगीपणा दिसतो. सत्तेच्या आणि खुर्चीच्या लालसेपोटी डावे तत्त्वे गुंडाळून ठेवून उजव्यांच्या वळचणीला गेल्याचा इतिहास आहे. ते विखुरले, विस्कळीत झाले. याउलट उजवे कट्टर राहिले. ते जात, धर्म, लिंग या अजेंड्यावर राजकारण आणि समाजकारण यशस्वी करीत राहिले. अशा टप्प्यात डाव्या विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन चळवळ बळकट करणे गरजेचे होते. आता तरी डाव्यांनी कट्टर राहायला हवे. प्रा. एन.डी. पाटील म्हणाले, राज्यघटनेनुसार देश चालतो; धर्मसंसदेनुसार नाही, हे सांगण्याची वेळ आली आहे. महात्मा फुले यांनी मांडलेल्या समाजव्यवस्थेची अंमलबजावणी झाली पाहिजे. (प्रतिनिधी)
डाव्यांच्या बेइमानीमुळे उजवे माजले
By admin | Published: January 18, 2016 3:51 AM