मुंबई : जेथे बेकायदा काम सुरू असेल तेथे पोलिसांना छापा टाकण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी नागरिकांच्या खासगी आयुष्यात लक्ष घालण्यात येऊ नये, असे निरीक्षण मंगळवारी उच्च न्यायालयाने नोंदवले.गेल्या वर्षी पोलिसांनी मालवणीमधील हॉटेल्सवर छापा मारून अनेक प्रेमी युगुलांना ताब्यात घेत दंड ठोठावला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी बेकायदेशीरपणे व मनमानी कारभार करत छापा घातला. तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत नागरिकांना बहाल करण्यात आलेल्या खासगीपणा जपण्याच्या अधिकारावर घाला घालण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका खार येथील रहिवासी सुमीर सबरवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाकडे होती. मंगळवारच्या सुनावणीत मुख्य सरकारी वकील संदीप शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी छापा घालण्यासंदर्भात मागदर्शक तत्त्वे आखल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘नागरिकांच्या ‘खासगीपणा’ जपण्याच्या अधिकारावर गदा येणार नाही, अशी सक्त ताकीदच मागदर्शक तत्त्वाद्वारे देण्यात आली आहे,’ असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.‘हॉटेल किंवा लॉजमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या महिलांची चौकशी करण्यासाठी महिला अधिकारीच असतील किंवा महिला अधिकाऱ्याच्या उपस्थित पुरुष अधिकाऱ्याने महिलेची चौकशी करावी. एखाद्या ग्राहकाने हॉटेलमध्ये खोटी ओळख कागदपत्रे सादर केली असतील किंवा एखाद्या ग्राहकावर पोलिसांना संशय असेल तर पोलिसांनी हॉटेलधील एका कर्मचाऱ्याला बरोबर घेऊन संबंधित रूमवर जावे. तसेच छापा मारताना पोलिसांनी बिल्ला जवळ बाळगावा. तसेच एखाद्याने पोलिसांकडे ओळखपत्र मागितले तर ते त्याला दाखवावे,’ असे मगादर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.मात्र ही मागदर्शक तत्त्वेही नागरिकांच्या खासगी आयुष्यावर अतिक्रमण करणारी आहेत, असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. सुनावणी २९ जूनपर्यंत तहकूब करत कोर्टाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना मागदर्शक तत्त्वांबाबत सूचना करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) >खासगी आयुष्यावर घाला घालू नये‘जर एखाद्या हॉटेलमध्ये काही बेकायदेशीर कृत्य करण्यात येत असेल किंवा अश्लील बाबी होत असतील आणि याची माहिती पोलिसांनी मिळाली, तर त्यांना त्या ठिकाणी नक्की काय घडत आहे, हे पाहण्यासाठी छापा घालणे आवश्यक आहे. पोलिसांना छापा घालण्याचा अधिकार आहे. मात्र छापा घालताना त्यांनी नागरिकांच्या खासगी आयुष्यावर घाला घातला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
पोलिसांना छापा टाकण्याचा अधिकार
By admin | Published: June 08, 2016 3:37 AM