लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खासगी डॉक्टरांना सहकार्य करावेच लागेल. शासकीय यंत्रणेने त्यांच्या सेवेची मागणी केली तर त्यांना सेवा द्यावीच लागेल. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महामारीत वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना समन्स देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे; परंतु अद्याप तशी वेळ आलेली नाही, असे इशारेवजा स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी शनिवारी येथे दिले.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला मृत्यूदर, प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावलेल्या बैठकीला पवार यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, भविष्यातील दृष्टीने पालकमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेऊन खासगी वैद्यकीय सेवेबाबत तरतूद केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ज्या यंत्रणेची आवश्यकता आहे, ती यंत्रणा सरकारला ताब्यात घेता येते. उद्या मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन औरंगाबादेत काय कमी आहे, ते सांगणार आहे....म्हणून मी फिल्डवरपवार म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरश: या एका कामातच अखंडपणाने बसलेले आहेत. सबंध महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेता येणे अवघड होईल. आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सर्व टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. मला करमत नाही.एका जागी बसवत नाही. मी सतत लोकांत राहणारा माणूस आहे, म्हणून मी फिल्डवर जातो, अशी मिश्कील टीपण्णीही पवार यांनी केली.