परळी- भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याचा वाद यंदाही कायम आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा दसरा मेळाव्याला विरोध कायम आहे. तर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक दसरा मेळाव्यासाठी ठाम आहेत. भगवान गडावरील दसरा मेळाव्याबाबतची आज माझी भूमिका स्पष्ट नाही, एकीकडे हजारो श्रद्धाळूंची भावना तर दुसरीकडे श्रद्धास्थान भगवान गड आहे, त्यामुळे याबद्दल 'योग्य वेळी योग्य निर्णय' घेऊन भूमिका स्पष्ट करू, असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. पंकजा मुंडे परळीत बोलत होत्या.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 व्या गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे परळीत आल्या होत्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्या संदर्भात बोलताना आपण ' योग्य वेळी, योग्य निर्णय' घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत मुंडे यांचे भाषण झाले, परंतु त्यांनी यावेळी मेळाव्यावर बोलायचं टाळलं.
भगवानगड दसरा मेळाव्यावरून समर्थकांमध्ये वादभगवानगडावर दसरा मेळावा घेण्यावरून मंत्री पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री यांच्या समर्थकांमध्ये वाद सुरू झाले आहेत. याबाबत त्यांच्या समर्थकांनी परस्परविरोधी निवेदने जिल्हा प्रशासनाला दिली आहेत. श्रीक्षेत्र भगवानगडावर अनेक वर्षांपासून दसरा मेळावा होतो. वंजारी समाजाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यामुळे ३० सप्टेंबरला दसरा मेळावा गडावर घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बुलढाणा व वाशिम जिल्हा कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी केली. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गड ताब्यात घेऊन दसरा मेळाव्यास विरोध केल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजीही करण्यात आली.महंत नामदेवशास्त्री सानप यांच्या समर्थक असलेल्या शेवगाव तालुक्यातील राणेगाव व शिंगोरी येथील ग्रामस्थांनी शेवगावचे तहसीलदार दीपक पाटील यांना बुधवारी निवेदन दिले. श्री क्षेत्र भगवानगड हे स्थान राजकारणविरहित आहे. त्याचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासनाने दसऱ्याच्या दिवशी येथे कुठल्याही मेळाव्यास परवानगी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.