पुणे : ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. या प्रकरणामुळे मुंडे यांची आमदारकी व मंत्रीपद देखील धोक्यात आली आहे. भाजपने सुद्धा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणामध्ये वंचित बहुजन विकास आघाडीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केले आहे.
पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आंबेडकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्कारसंबंधी आरोपावर प्रतिक्रिया देताना हा गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे आता यावर मुंडे यांनी हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचे आहे की नाही ते ठरवायला हवे. मात्र आज ना उद्या केलेला गुन्हा हा बाहेर येतच असतो. त्याच अनुषंगाने आता मुंडे यांनीच 'धिस ईज अ राईट टाईम' म्हणावे असे महत्वपूर्ण विधान केले आहे.
केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात मुस्लिम बांधव वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली येत्या २७ जानेवारीला महाराष्ट्रभर आंदोलन करणार करणार आहे. तसेच गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने कृषी कायद्यांबाबत केंद्र सरकारला फटकारताना चार जणांची समिती स्थापन केली आहे. पण याचवेळी आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांनी या समितीला विरोध केला आहे.
सत्ता टिकवायची का नाही हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा... औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना व काँग्रेस हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे देखील समोर आले आहे. त्यानंतर काहीच दिवसात मुख्यमंत्र्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून औरंगाबादचा संभाजीनगर व उस्मानाबादच्या पुढे धाराशिव असा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे नामांतराचा वाद आणखी उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण त्याचसंबंधी आपली भूमिका जाहीर करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सत्ता टिकवायची की नाही याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे.